कल्याण : शासन पातळीवरून नद्यांना नाल्यांचे कागदोपत्री रूप देऊन या नद्यांमध्ये मातीचे भराव, अतिक्रमणे करून नद्या नष्ट करून टाकण्याचे जोरदार प्रयत्न विशिष्ट घटकांपासून सुरू आहेत. एकप्रकारे या नद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोप जलसंवर्धक राजेंद्र सिंह यांनी कल्याण येथे केला. नद्यांचा प्रवाह नष्ट करणे मानवी, पर्यावरण जीवनाला खूप घातक आहे. या गोष्टी वेळीच रोखल्या पाहिजेत, असे मॅगसेसे पुरस्कार विजेते सिंह यांनी गुरुवारी येथे नद्यांच्या पाहणीदरम्यान सांगितले.
राजेंद्र सिंह, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत, पर्यावरणप्रेमी, कल्याणमधील विद्यार्थी यांनी उल्हास खाडी, वालधुनी नदी, भिवंडी, कल्याणमधील खाडी यांची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबईसह परिसरातील नद्यांची खूप दुरवस्था झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित नद्या कोठे असतील तर त्या मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या नद्यांना सुस्थितीत, प्रदूषणमुक्त करण्याऐवजी शासन पातळीवर या नद्यांची नोंद नाले म्हणून करण्यात आली आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे नाल्यांच्या नोंदी नदी म्हणून शासन दप्तरी नोंदविण्यात येत आहेत. नाल्यांच्या उल्लेख करून नद्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा मोठा डाव असल्याची भीती राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
भिवंडीत कामावरी नदीत पात्रात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. शेजारी बांधकामे सुरू आहेत. भरावामुळे पाणी अडून ते तेथेच मुरणार. नद्यांमध्ये परिसरातील रासायिनक, सांडपाणी वाहून येते. हे पाणी जमिनीत मुरल्याने ते परिसरातील कूपनलिकांद्वारे रहिवाशांच्या पोटात जाणार आहे. यामधून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. याचा कोणी विचार करताना दिसत नाही, अशी खंत सिंह यांनी व्यक्त केली.
खाडीकिनारी कचराभूमी
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ खाडीकिनारी असलेली कचराभूमी पाहून सिंह यांनी उव्दिग्नता व्यक्त केली. नदी, खाडीच्या किनारी कधीही कचराभूमी नसावी. पावसाळय़ात कचराभूमीतील सर्व घातक घटक नदी, पाण्यात वाहून जातात. हेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नदीकिनारच्या कचराभूमी स्थानिक प्रशासनानी तातडीने बंद केल्या पाहिजेत. येणारी पिढी सजग, जागृत आहे. त्यामुळे ती नदी संवर्धनासाठी नक्कीच पुढाकार घेईल असा आपणास विश्वास आहे. आतापासून आपण नदी, नाले, खाडी संवर्धनाचे उपक्रम हाती घेतले नाहीत तर येणारी पिढी तुम्ही जलसंवर्धनासाठी काय केले म्हणून जाब विचारणार आहे, असे सिंह यांनी सांगितले.