उत्पादनावर परिणाम, उद्योजक चिंतित 

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक, निवासी क्षेत्राला अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कंपन्यांना उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होतो, अशा तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ६५० रासायनिक, कापड उद्योग, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिक उत्पादनांच्या कंपन्या आहेत. रासायनिक, कापड प्रक्रिया उद्योगासाठी सर्वाधिक पाणी लागते. या कंपन्यांना एमआयडीसीकडून त्यांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उद्योजकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने उत्पादन कमी घ्यावे लागते.  दररोज खासगी पुरवठादारांकडून पाणी खरेदी करणे शक्य होत नाही. उद्योजकांना वेळेत उत्पादन करून त्याची देशात, परदेशात पाठवणी करावी लागते. मुबलक पाणीपुरवठा कंपन्यांना होत नसल्याने अनेक उद्योजक अडचणीत आले आहेत, अशी माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

परदेशस्थ अनेक कंपन्यांनी उत्पादनासाठी डोंबिवलीतील कंपन्यांबरोबर करार केले आहेत. परदेशस्थ उद्योजक कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्थानिक कंपनीत पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठा अशा काही त्रुटी आढळून आल्या की त्याचे अहवाल ते आपल्या परदेशातील कंपन्यांना देतात, त्याचा परिणाम कंपनीच्या नाममुद्रेवर होतो, असे उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांची अडचण विचारात घेऊन काटई ते एमआयडीसीदरम्यान ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. करोनाकाळात रेंगाळलेल्या कामाने आता गती घेतली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन एमआयडीसी क्षेत्राला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिले आहे, असे सोनी यांनी सांगितले.

काटई ते एमआयडीसी दिशेने एक जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की एमआयडीसी विभागाला पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध होईल.

रमेश पाटील, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी