ठाणे : महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या सहायक आयुक्तपदी वादग्रस्त अधिकारी महेश आहेर यांच्या   नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. परंतु वादग्रस्त अधिकारी आहेर यांना अतिक्रमण विभागाची जबाबदारी देऊन या शहराला माफियानगरी बनविण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तसेच आहेर यांची नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीचे पत्र आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

ठाणे महापालिकेतील उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उप कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांना सहायक आयुक्त पदावर बढती देऊन अतिक्रमण विभाग देण्यात आला आहे. त्यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप झाले असून यामुळे ते पालिकेतील वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या दबावामुळे त्यांची बदली झाली असल्याची शहरात चर्चा सुरू असतानाच त्यावर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाष्य केले आहे.  ठाणे महापालिकेत शिवसेना आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे एकत्रितपणे मनमानी कारभार करत असून त्याचबरोबर ते सर्व बेकायदा गोष्टींना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या सहायक आयुक्त पदावर वादग्रस्त अधिकारी महेश आहेर यांची नेमणूक करून बेकायदा बांधकांमांना एकप्रकारे पाठबळ देण्याचे काम करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांचे शहर असा उल्लेख ठाणेकर कदापी सहन करणार नाहीत. आयुक्तांचा बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सफाई कामगारांपासून ते बेकायदा बांधकामांविरोधात तक्रारी करणाऱ्या अनेक नागरिकांचा आहेर यांच्या नियुक्तीला आक्षेप आहे. त्यांची नियुक्ती अतिक्रमण विभागात करणे हे संतापजनक आहे. यामागे कोणती गोल्डन गॅंग कार्यरत आहे, याचा भांडाफोड योग्य वेळी केला जाईल, असेही ते म्हणाले. पुढील काळात बेकायदा बांधकामांविरोधात लोकसहभागातून मोहीम राबिवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.