फडणीस समूहाच्या संचालक, एजंटविरुद्ध ठाण्यात गुन्हा; ९०० जणांची फसवणूक

आर्थिक गुंतवणुकीसंबंधीच्या वेगवेगळ्या योजनांमधून जादा व्याज दराचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फडणीस ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये

कंपनीचे अध्यक्ष विनय फडणीस, संचालिका अनुराधा फडणीस, सायली फडणीस-गडकरी, साहिल फडणीस, शरयू ठकार इतर संचालक आणि एजंट सच्चिदानंद खरे यांचा समावेश आहे. या कंपनीने आठशे ते नऊशे गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठाणे येथील वृंदावन परिसरातील मुकुंद माधव धायगुडे (५८) यांची पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सच्चिदानंद लक्ष्मण खरे या माजी विद्यार्थ्यांसोबत ओळख झाली. अंधेरी भागातील एका औषध कंपनीत सच्चिदानंद हे सरव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. २००८ पासून त्यांनी चरई भागात वंडर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स या नावाने आर्थिक गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता.

सप्टेंबर २०१३ मध्ये मुकुंद धायगुडे यांना कार्यालयात बोलावून सच्चिदानंद यांनी त्यांना फडणीस ग्रुप ऑफ कंपनीबाबत माहिती दिली. तसेच या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

या योजनेत पैसे गुंतविल्यानंतर कंपनीने त्यांना धनादेश आणि पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या होत्या. सुरुवातीचे काही महिने त्यांना ठरलेल्या व्याज दरानुसार नियमित पैसे मिळाले. मात्र, त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले. या संदर्भात त्यांनी फडणीस ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळेस कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पैसे देणे शक्य नाही. मात्र, काही काळानंतर मात्र व्याजासहित पैसे मिळतील, असे आश्वासन त्यांच्याकडून त्यांना देण्यात आले. मात्र, गुंतवणूक केलेले चार लाख रुपये आणि त्याचे व्याज दीड लाख रुपये अशी एकूण साडेपाच लाख रुपयांची रक्कम कंपनीने त्यांना परत केली नाही. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त एस. टी. अवसरे करीत आहेत. दरम्यान, या कंपनीमार्फत फसवणूक झालेल्यांनी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन अवसरे यांनी केले आहे.

फसवणुकीचा आकडा मोठा

आर्थिक गुंतवणुकीसंबंधीच्या वेगवेगळ्या योजनांमधून जादा व्याज दराचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३५ ते ४० गुंतवणूकदार पुढे आले असून त्यांच्या फसवणुकीचा आकडा चार ते पाच कोटी रुपये इतका आहे. असे असले तरी या प्रकरणात आठशे ते नऊशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय असून फसवणुकीचा आकडा कोटय़वधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.