चढया व्याजाचे आमिष दाखवून एका खासगी गुंतवणूकदार कंपनीने डोंबिवली, कल्याणमधील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. कबुल केलेले व्याज नाहीच, पण गुंतवणुकीची मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक; महिला गंभीर जखमी
सेरेनिटी स्वास्थम आयुर्वेदा प्रायव्हेट लिमीटेडचे मालक सुनील महेंद्रप्रताप सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत हा फसवणकीचा प्रकार घडला आहे. कल्याण मधील गायत्री एन्टरप्रायझेसच्या संचालिका सुधा अरुण त्रिपाठी यांनी महेंद्रप्रताप सिंग यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. सुधा त्रिपाठी यांची स्वत:ची एक कोटी एक लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
हेही वाचा- ठाणे: कामगार नेते राजन राजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले, सेरेनिटी स्वास्थमचे मालक सुनील सिंग यांनी सुधा त्रिपाठी यांच्यासह डोंबिवली, कल्याण परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना मूळ गुंतवणुकीवर चार टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याजाचे आमिष दाखविले. या चढ्या व्याजाला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी सुनील यांच्या सेरेनिटी कंपनीत गुंतवणूक केली. सुधा त्रिपाठी यांनीही अशाच पध्दतीने एक कोटीची गुंतवणूक केली. वर्षभराच्या कालावधीत आकर्षक परतावा मिळणे अपेक्षित असताना तो देण्यास आरोपी सुनील सिंग टाळाटाळ करू लागले.
गुंतवणूकदारांनी व्याज नको पण मूळ रक्कम परत करा म्हणून तगादा लावला. त्यालाही आरोपीने दाद दिली नाही. सुधा त्रिपाठी यांच्या गायत्री एन्टरप्रायझेसच्या नावाने आरोपी सुनील सिंग यांनी अनेक कंपन्यांकडून उधारीने माल उचलला. त्या मालाची रक्कम वेळेत दिली नाही. ही थकीत रक्कम वसुलीसाठी इतर कंपन्यांनी गायत्री एन्टरप्रायझेसकडे तगादा लावला. त्यावेळी सुधा त्रिपाठी यांना आरोपी सुुनील यांनी केलेले इतर बनावट उद्योग दिसून आले. या प्रकरणात आरोपीने सुधा यांची एक कोटीची फसवणूक केली. अशाप्रकारे इतर गुंतवणूकदारांची वर्षभराच्या कालावधीत आरोपी सुनील सिंग याने फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजांशु पाटील करत आहेत.