scorecardresearch

सेवा पुरवठा कंपन्यांच्या फसवणुकीत डोंबिवली पलावा मधील एम. टेक. इंजिनीअरचा सहभाग

पाच जणांच्या टोळीला मानपाडा पोलिसांकडून अटक

सेवा पुरवठा कंपन्यांच्या फसवणुकीत डोंबिवली पलावा मधील एम. टेक. इंजिनीअरचा सहभाग
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला मानपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

ॲमेझॉन, फ्लीपकार्ट सारख्या सेवा पुरवठादार कंपन्यांकडून महागड्या वस्तू बनावट आधारकार्डव्दारे खरेदी केलेल्या सीमकार्ड मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन मागवून घ्यायच्या. या वस्तू वितरक सेवक दारात आला की त्याच्याकडून वस्तूचा खोका ताब्यात घेऊन, त्याला बोलण्यात, पैसे मोजण्यात गुंतवून गुपचूप खोक्यातील महागडी मोबाईल व इतर तत्सम वस्तू काढून घ्यायची. त्या खोक्यात वजनदार कपडा, दगड भरुन तो खोका पुन्हा बंद करायचा. आणि आता आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, असे बोलून ती वस्तू परत ॲमेझॉन, फ्लीपकार्टकडे पाठवून द्यायची. अशाप्रकार महाराष्ट्रासह कोलकत्ता, गुजरात भागात पुरवठादार कंपन्यांची, ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला मानपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दुचाकी चोरणारा आजदे गावातील सराईत चोरटा अटक, १० दुचाकी जप्त, एक सायकल जप्त

या टोळीकडून पाच लाखाहून अधिक किमतीचे २२ मोबाईल, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब, २९ बनावट आधारकार्ड, २० सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. या फसवणुक व्यवहार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या डोंबिवलीतील पलावा वसाहती मधील रॉबीन ॲन्टनी आरुजा (२८, रा. खोली क्र. ७०५, एफ, रिव्हर व्ह्यु, कासारीयो, पलावा) आहे. तो मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदव्युत्तर पदवी प्राप्त अभियंता आहे. रॉबीनला रॉकी दिनेशकुमार कर्ण (२२, रा. उपासना सोसायटी, राजाराम पाटील नगर, आडीवली-ढोकळी, पिसवली, कल्याण पूर्व) या कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणाची साथ होती. अलोक गुल्लु यादव (२०, रा. जय मातादी चाळ, नॅशनल शाळे जवळ, दिवा शीळ रस्ता, डोंबिवली पूर्व) हा सीमकार्ड विक्रेता आरोपींना आरोपींना ग्राहक, आधारकार्डची खात्री न करता सीमकार्ड वाढीव पैसे स्वीकारुन विकायचा. त्या पैशातून तो मौजमजा करायचा.

हेही वाचा >>> कल्याण जवळील नेवाळी पाडा येथे महावितरण कर्मचाऱ्यावर ग्रामस्थाचा हल्ला

बनावट आधारकार्डव्दारे सीमकार्ड खरेदी करुन त्या क्रमांकावरुन मोबाईलच्या माध्यमातून ॲमेझॉन, फ्लीपकार्ट या पुरवठादार कंपन्यांकडून किमती साहित्य मागवून त्यांची फसवणूक करणारी टोळी कल्याण पूर्वेतील काका ढाब्या जवळील गणेश चौकातील स्वप्नसुंदर रेसिडेन्सीमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याला मिळाली होती. रामनगर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गेल्या आठवड्यात पाच जणांना अटक करुन त्या खोलीतील किमती साहित्य जप्त केले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> ठाणे : कशेळी-काल्हेर भागात वाहतूक कोंडी ; बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू

या टोळीची कसून चौकशी केल्यावर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांना या टोळीचा मुख्य म्होरक्या पलावा उच्चभ्रू वस्तीमधील एक उच्च शिक्षित अभियंता असल्याचे समजले. हे ऐकून पोलीस हैराण झाले. किरण अमृत बनसोडे (२६, रा. स्वप्नसुंदर रेसिडेन्सी, काका ढाबा, कल्याण), नवीनकुमार राजकुमार सिंग (२२, सद्गुरु प्लाझा, काका ढाबा) अशी इतर आरोपींची नावे आहेत. ही टोळी झटपट पैसे कमविण्यासाठी गुगलवरुन नागरिकांची आधरकार्ड स्थापित करुन घ्यायची. या आधारकार्डवरील छायाचित्र काढून त्याठिकाणी स्वताचे छायाचित्र लावून त्या आधारे मोबाईल सीमकार्ड खरेदी करत होते. हे सीमकार्ड ते वाढीव पैसे मोजून अलोक यादवकडून खरेदी करायचे. बनावट सीमकार्डच्या माध्यमातून सेवा पुरवठादार कंपन्यांकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब, आयपॉड वस्तू मागविली की ही टोळी वितरक कामगार दारात आला की पहिले त्याच्या हातामधील महागड्या वस्तूचा खोका ताब्यात घ्यायची. त्या सेवकाला बोलण्यात गुंतवून तो खोका खोलीत घेऊन काही जण त्या खोक्यातील महागडी वस्तू काढून त्या खोक्यात तात्काळ वजनदार दगड, कापडाचा बोळा ठेऊन तो खोका बंद करायचे. या कालावधीत आमच्या जवळ पुरेसे पैसे नाही. आम्ही परत वस्तूची नोंदणी केली की तू परत ये असे सांगून त्या पुरवठादार कामगाराला पिटाळून लावायचे. ताब्यात घेतलेली वस्तू कमी किमतीत ग्राहकाला विकून मिळालेल्या पैशातून मौज करायचे. परत गेलेल्या वस्तूचा खोका ॲमेझॉन, फ्लीपकार्टच्या ताब्यात गेला की त्यांना खोक्यात दगड आढळून यायचा. ठरावीक भागात ही फसवणूक होत असल्याने पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली होती.

पोलिसांनी शिताफीने या टोळीला अटक केली. या टोळीने गुजरात, कोलकत्ता, महाराष्ट्रातील अलिबाग, ठाणे, पुणे, सातारा, मुंबई भागात असे गुन्हे केले आहेत. अलिबाग, कऱ्हाड, कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, हवालदार प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, ताराचंद सोनावणे यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Involvement of m tech engineer in dombivli palava in defrauding service supply companies amy

ताज्या बातम्या