ठाणे : इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा गंभीर परिणाम ठाणे जिल्ह्यातील लघु उद्योजकांना बसू लागला आहे. ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग नगरीत कच्च्या मालामध्ये झालेली दरवाढ, अपुरा गॅस पुरवठा, मजुरांचे सुरु असलेले स्थलांतर यामुळे उत्पादनांवर परिणाम होत असून एमआयडीसी क्षेत्रातील जवळपास सर्व उद्योजकांचे महिन्याभरात हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा संघर्ष कधी दूर होईल अशी चिंता उद्योजकांना लागली आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ हे तीन महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र आहेत. हजारो लघु उद्योग या क्षेत्रात वसले आहेत. रासायनिक उद्योग, कापड उद्योगांपासून लहान-सहान वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांचाही यामध्ये सामावेश आहे. या औद्योगिक पट्ट्यामुळे हजारो कामगारांना नोकऱ्या मिळत असून येथील वार्षिक उलाढाल देखील मोठ्याप्रमाणात होते. परंतु इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम आता या उद्योजकांना बसू लागला आहे. कच्चा माल वेळेत उपलब्ध होत नसल्याने त्याच्या किमतीमध्ये जवळपास ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच उद्योगांसाठी लागणारा गॅसचा पुरवठा वेळेत उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम देखील उद्योजकांवर होत आहे.
डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रात ४५० उद्योग आहेत. त्यापैकी १२५ व्यवसाय रासायनिक कंपन्यांची आणि ११५ कापड निर्मिती संदर्भातील आहेत. तर उर्वरित विविध क्षेत्रातील उद्योग आहेत. अंबरनाथ, डोंबिवली या एमआयडीसी क्षेत्रातून औषधे किंवा त्यासंदर्भातील उत्पादन, शेती व्यवसायाशी निगडीत उत्पादन अधिक प्रमाणात निर्यात होतात. आता उत्पादनात मोठी घट निर्माण झाली असून या उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ठाणे शहरातील वागळे इस्टेट एमआयडीसी येथील लघु उद्योजकांवरही परिणाम झाला असून त्याचे प्रमाणही शेकडो कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. उद्योजक नुकसान सहन करुन व्यवसाय सुरु ठेवत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मजुर त्यांच्या गावी जातात. परंतु यावेळी सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने आतापासूनच मजुर त्यांच्या गावी जात आहेत. कंत्राटी कामगार सुद्धा आता उपलब्ध नाहीत. डोंबिवली एमआयडीसीत महिन्याभरात अंदाजे ६०० ते ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. – देवेन सोनी, उद्योजक.
उद्योजकांना ३० ते ४० टक्के गॅस पुरवठा होत नाही. कच्च्या मालाचे दर वाढले असून हा माल आयात होण्यासही अनेक अडचणी येत आहेत. जेवण बनविण्यासाठी सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने परराज्यातील मजुर त्यांच्या गावी निघून जात आहेत. उत्पादनेही निर्यात होण्यासही विलंब होत आहे. – नारायण माने, अध्यक्ष, कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन (कामा).
अंबरनाथमध्ये १४०० कंपन्या आहेत. त्यामध्ये रासायनिक, अभियांत्रिकी, कापड, औषध निर्मिती यासह अनेक कंपन्यांचा सामावेश आहे. दरवर्षा १५ हजार ते १८ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. महिन्याभरात या क्षेत्रातील कंपन्यांचे अंदाजे ५०० ते ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील अनेक कंपन्या पीएनजीवर अवलंबून आहेत. त्याचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. तर जेवण बनविण्यासाठी एलपीजी उपलब्ध होत नसल्याने मजुर स्थलांतरीत होत आहेत. उद्योजकांना दिलासा मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचे सरकारकडे आवाहन करत आहोत.- उमेश तायडे, अध्यक्ष, ॲडिशनल अंबरनाथ मॅनुफॅक्चरिंग असोसिएशन (आमा).
