ठाणे : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले. तर या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले केले आहेत. यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून यासह आसपासच्या देशात अनेक भरतोय नागरिक अडकलेले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिक असण्याची शक्यता असून अशा नागरिकांची नातेवाईकांकडून माहिती मिळावी, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
अमेरिका आणि इस्रायली सैन्याने इराणवर संयुक्त हल्ले केले, त्यानंतर इराणने या प्रदेशातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. त्यानंतर दुबई, दोहा, अबू धाबी, मनामा आणि रियाध यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये हल्ले झाल्याची नोंद झाली, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आणि मध्य पूर्वेतील हवाई प्रवास विस्कळीत झाला. इराण आणि इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.
इराण, इस्रायल, दुबई, दोहा, अबू धाबी, मनामा आणि रियाध या देशांमध्ये अनेक भरतोय नागरिक अडकलेले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिक असण्याची शक्यता आहे. या नागरिकांची नातेवाईकांकडून माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण आणि इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४० / ९३७२३३८८२७ ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२५४४५३५३ / ०२२-२५४४२८२८ / ०२२-२५४४३६३६ मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९०
