डोंबिवली : डोंबिवलीत नववर्ष शोभा यात्रेच्या मार्गात राजकीय नेत्यांचे भव्य फलक, रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भव्य कमानी उभारण्यात आल्याने हे नववर्षाचे स्वागत आहे की, कोणत्या निवडणुकीची तयारी आहे, असे उव्दिग्न प्रश्न शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ग्रामस्थांनी काढलेल्या स्वागत यात्रेत आनंदाने सहभागी होण्याऐवजी फलकबाजीतून शहराचे विद्रुपीकरण करण्याचा अधिकार राजकीय नेत्यांना कोणी दिला? कल्याण डोंबिवली पालिकेने या फलकबाजीला परवानगी दिली आहे का? असे अनेक प्रश्न संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरी समस्यांनी हैराण डोंबिवलीतील नागरिकांनी राजकीय नेत्यांच्या फलकबाजीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध जाती, प्रांत, धर्माच्या ग्रामस्थांना एका व्यासपीठावर आणावे, या विचारातून डोंबिवलीत पहिली नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्था या उपक्रमात सहभागी होऊ लागल्या. श्री गणेश मंदिर संस्थानने केलेल्या नियोजनातून २५ वर्ष डोंबिवलीत स्वागत यात्रा काढण्यात येत आहे. कधीही यात्रेच्या वाटेवर यापूर्वी कोणत्याही राजकीय नेता, पदाधिकाऱ्याने आपल्या केंद्रीय नेतृत्वापासून ते झोपडपट्टीतील पदाधिकाऱ्यांचे फलक लावून आपल्या ‘श्रीमंती’चे प्रदर्शन, फुशारकी किंवा आपली नागरिकांसमोर छबी राहिल असे प्रदर्शन कधीच केले नाही. माजी खा. दिवंगत राम कापसे, प्रकाश परांजपे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आ. रमेश पाटील यांच्या कार्यकाळातही डोंबिवलीत शोभा यात्रा निघत होत्या. त्यांनी कधीही नववर्ष स्वागत यात्रेचे औचित्य साधून आपले फलक, छब्या यात्रेच्या वाटेवर राहतील, अशी व्यवस्था केली नाही.

हेही वाचा… शोभा यात्रेनिमित्त सांस्कृतिक पथावर डोंबिवलीकरांचा जल्लोष

राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या छब्या असलेले फलक, रस्ते अडविणाऱ्या कमानी उभारुन, शहराचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न नेत्यांनी करू नये, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा… ठाणे : रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचे सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण

क्षितिज दिसणार नाही अशा आकाराचे फलक, वाहन वळणार नाही अशा पध्दतीने कमानी लावून नेते मंडळींनी काय साध्य केले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून शहर स्वच्छ, सुंदर असावे अशी नागरिकांची इच्छा असताना, नेत्यांनी फलकबाजीतून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांना हा प्रकार दिसत नाही का. की त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. शहरात एकही फलक दिसता कामा नये, असे वेळोवेळी आदेश देणारे आयुक्त दांगडे आता का गप्प बसले आहेत, असे नागरिकांचे प्रश्न आहेत. फलकबाजीतून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळाला नसेल तर आयुक्तांनी रात्रीतून सर्व कमानी, फलक हटवावेत अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा… भिवंडी पालिकेचा काँक्रीट रस्ते, पाणी, आरोग्य, वीज निर्मीतीचा संकल्प; अटल आनंद घन वन प्रकल्पांतर्गत शहरभर वृक्षांची लागवड

फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या छब्या आहेत.

काटशहाचे राजकारण

कोणत्याही परिस्थितीत डोंबिवलीत आपलाच वरचष्मा दिसला पाहिजे या भूमिेकेतून मागील दोन वर्षापासून खा. शिंदे काम करत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांचा आश्रयदाता मीच आहे, अशी त्यांची आक्रमक भूमिका आहे. चव्हाण, मनसेचे आ. पाटील यांचे अस्तित्व येथे नगण्य कसे दिसेल यासाठी खा. शिंदे प्रयत्नशील आहेत. शिवसेना-भाजपच्या चढाओढीतून आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेऊन स्वागत यात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी केला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : माजी गृहमंत्री अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, २३ मार्चपर्यंत ईडी कारवाई नाही

विकासकामांची धूळदाण

डोंबिवलीत रस्ते, पाणी, विजेचा लपंडाव, बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहेत. या विषयावर चकार शब्द न काढणारे लोकप्रतिनिधी नववर्ष दिनी फलकातून लोकांच्या भेटीला आल्याने अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना,भाजप, मनसेमधील कार्यकर्ते खासगीत याविषयी नाराज आहेत. नागरिक याविषयी उघड बोलण्यास तयार नाहीत.

“ रस्त्यावरील राजकीय फलकबाजीशी गणेश मंदिर संस्थानचा संबंध नाही. स्वागत यात्रेच्या नियोजनाप्रमाणे मंदिराचे नियमित कार्यक्रम सुरू आहेत. रस्त्यावर कोण काय करतय याच्याशी आमचा संबंध नाही. – अलका मुतालिक, अध्यक्षा, गणेश मंदिर संस्थान.

“राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. त्यामुळे काही फलक शिवसेना, काही भाजपने लावले आहेत. नेत्यांची फलकावरील जागेप्रमाणे वर्णी लावली आहे. यात कोणतेही राजकारण नाही.” – शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

डोंबिवलीत स्वागत यात्रेच्या वाटेवर लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे फलक आणि रस्ते अडविणाऱ्या कमानी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is this gudi padwa new year welcome procession or election campaign full of political banners along procession route in dombivli asj
First published on: 20-03-2023 at 18:20 IST