आठवडय़ाची मुलाखत : फुलपाखरांचा यशस्वी संघर्ष

फुलपाखरांविषयी ब्रिटिशांनी त्याकाळात अनेक नोंदी केल्या होत्या. मात्र त्या वेळची साधने मर्यादित होती.

कितीही सुंदर दिसली तरी फुलपाखरे तशी दुर्लक्षितच राहिली आहेत. एवढी की त्यांना स्थानिक नावे देण्याचेही कोणाला सुचलेले नाही. मात्र या फुलपाखरांच्या नोंदी करण्यात गेली तीसहून अधिक वष्रे मग्न असणाऱ्या, बीएनएचएसचे उपसंचालक आयझॅक किहीमकर यांना या लहान कीटकाने संपूर्ण देशाचे दर्शन घडवले. फेसबुकसारख्या समाज माध्यमांमुळे तरुण मुख्य कामापासून दूर राहत आहेत, अशी ओरड होत असतानाच फुलपाखरांच्या अभ्यासासाठी व ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ या पुस्तकासाठी समाज माध्यमांनीच मोठा हातभार लावला, असे किहीमकर सांगतात.
आयझॅक किहीमकर, ‘बीएनएसएच’चे उपसंचालक

* गेल्या तीस वर्षांत फुलपाखरांच्या जगात काही बदल झालेले जाणवले आहेत का?
फुलपाखरांविषयी ब्रिटिशांनी त्याकाळात अनेक नोंदी केल्या होत्या. मात्र त्या वेळची साधने मर्यादित होती. आता मात्र जंगलात, हिमालयात उंचावर जाता येते. डिजिटल फोटोग्राफी आली आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या नोंदी करण्याचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे फुलपाखरांच्या ज्ञात प्रजातींची संख्याही वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे अनेक पक्षी, प्राणी नामशेष होण्याच्या वाटेवर असताना नाजूक फुलपाखरांनी मात्र अस्तित्व टिकवले आहे.
* फुलपाखरेही पक्ष्यांप्रमाणे स्थलांतर करतात का?
हो.. हो.. फुलपाखरांच्या संवेदना तीव्र असतात. गंध आणि दृष्टी याबाबत हे माणसाच्या कितीतरी पुढे आहेत आणि त्यामुळे वातावरणातला बदल त्यांना तातडीने जाणवतो. हिमालयातील वरच्या भागात थंडी वाढली की ती खाली येतात. एखाद्या भागात प्रचंड पाऊस होत असल्यास कमी पावसाच्या प्रदेशात जातात. आपल्याकडे माथेरानला अशी स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसतात. त्यांचे आयुष्य अल्पकाळाचे असते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर त्यांची तिसरी किंवा चौथी पिढी पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचते. फुलपाखरांच्या या स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे हवामानबदलांचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांचा उपयोग होतो.
* मुंबई, महाराष्ट्रात फुलपाखरांचे वैविध्य किती आहे?
मुंबईत फुलपाखरांच्या साधारण १४५ प्रजाती आढळत होत्या. मात्र आता नवीन नोंदी झाल्या असून ही संख्या १५३ वर पोहोचली आहे. सह्य़ाद्री घाटातही ३५० प्रजाती आढळतात. भारतात फुलपाखरांचे सुमारे १३०० प्रकार आहेत. त्यातील १००० हून अधिक फुलपाखरे ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. साधारणपणे पश्चिम घाट आणि ईशान्य भारत हे फुलपाखरांचे हॉट स्पॉट आहेत.
तेथील फुलपाखरांचे रंग व आकार यात प्रचंड वैविध्य जाणवते.
गंमत म्हणजे फुलपाखरांचे जेवढे रंग आपल्याला दिसतात ते सर्व रंग खरे नसतात. खवल्यांवर प्रकाशकिरणे परावíतत होऊन काही आभासी रंग तयार होतात. पेट्रोलवर पाणी पडले किंवा साबणाच्या फेसावर दिसणाऱ्या रंगांप्रमाणे ते असतात. त्याचप्रमाणे आपल्याला बरीचशी फुलपाखरे पिवळी दिसत असली तरी अतिनील किरणेही पाहू शकत असलेल्या फुलपाखरांना ते रंग वेगवेगळे दिसतात व त्यातले नर-मादी ते ओळखू शकतात.
* फुलपाखरांचा अभ्यास करताना अडचणी आल्या का?
अडचणींपेक्षा त्यातून मिळालेला आनंद मोठा आहे. ईशान्य भारत, सिक्कीम पाहता आला. त्यातच फेसबुकसारख्या माध्यमामुळे अनेक फुलपाखरू अभ्यासकांच्या गटांशी जोडला गेलो. आज समाज माध्यमावर फुलपाखरांशी संबंधित विविध प्रदेशातील २५ ते ३० गट आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ इथलेही तरुण या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत. या पुस्तकातील बहुतांश फोटो मला या गटांकडूनच मिळाले आहेत. ‘केसर ए हिंद’ हे अतिशय दुर्मीळ फुलपाखरू. संग्रहालयात मृत फुलपाखरू जतन केलेले असले तरी आतापर्यंत जिवंत फुलपाखराचे छायाचित्र उपलब्ध नव्हते. अरुणाचलमधील एका डॉक्टरांनी या फुलपाखराचे छायाचित्र काढल्याचे मला समजले. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सहजपणे ते छायाचित्र दिले. फुलपाखराच्या अभ्यासकांना राज्याच्या, देशाच्या सीमा बांधून ठेवत नाहीत.
* तरुण पिढीही फुलपाखरांच्या अभ्यासात रस घेते आहे का?
त्यांना भरपूर साधने उपलब्ध आहेत आणि अभ्यास करण्यासाठी वावही आहे. भरपूर माहिती उपलब्ध आहे व ती सहज मिळण्याचीही सोय आहे. त्यामुळे तरुण पर्यावरणाचा अभ्यास करताना दिसत आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी आम्हीही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Isaac kehimkar author of the book of indian butterflies