ठाणे : इस्रायलमध्ये ‘धन्यवाद’ला ‘तोडा’, तर ‘प्रेम’ला ‘अहावा’ म्हणतात… शॉरमा आणि फलाफल हे तेथील लोकप्रिय खाद्यपदार्थ, तर तरुणांसाठी सैनिकी सेवा हा जीवनाचा महत्त्वाचा टप्पा. इस्रायलमधून ठाण्यातील शाळेत आलेल्या पाच युवा प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या देशातील अशा अनेक रंजक गोष्टींची माहिती दिली. हिब्रू भाषेतील शब्द फळ्यावर लिहून दाखवण्यापासून संगीत, खेळ आणि कृतींमधून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यापर्यंत हा सांस्कृतिक संवाद रंगला.

ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ संचालित

आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता पाचवी ‘ब’च्या विद्यार्थ्यांना ‘इंडो-इस्त्रायल कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम’अंतर्गत इस्रायलमधून आलेल्या युवाल, याईल, लॅओर, अदिर आणि गाली या युवा प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. संवादाच्या सुरुवातीला इस्रायली तरुणांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेची ओळख करून दिली. हिब्रू भाषेतील काही शब्द फळ्यावर लिहून दाखवत त्यांचा उच्चार आणि अर्थही समजावून सांगितला. ‘तोडा’ म्हणजे धन्यवाद, तर ‘अहावा’ म्हणजे प्रेम, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच भारतामध्ये एखाद्याला भेटताना हात जोडून ‘नमस्कार’ केला जातो. त्याचप्रमाणे इस्रायलमध्येही अभिवादनाची स्वतःची पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषेची नव्हे, तर दैनंदिन जीवनातील सांस्कृतिक फरकांचीही ओळख झाली. इस्रायलमधील खाद्यसंस्कृतीविषयीही विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. शॉरमा आणि फलाफल हे तेथील लोकप्रिय खाद्यपदार्थ असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. फलाफलचा शाकाहारी प्रकारही तेथे आवडीने खाल्ला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

सणासुदीला कुटुंब पुन्हा एकत्र

इस्रायलमधील सण-उत्सव आणि कुटुंबपद्धतीविषयीही या तरुणांनी माहिती दिली. विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सणांच्या काळात कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, एकत्र जेवण करतात आणि वेळ घालवतात, असे त्यांनी सांगितले. कुटुंबासोबत राहत असतानाही तरुणांना स्वतःची स्वतंत्र ‘स्पेस’ महत्त्वाची वाटते. शिक्षण किंवा पुढील आयुष्यातील टप्प्यांवर स्वतंत्र राहण्याची पसंतीही अनेक तरुण देतात, अशी माहिती प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली.

बास्केटबॉलपासून संगीतापर्यंत संवाद

या भेटीत केवळ माहितीची देवाणघेवाण न होता खेळ आणि संगीताचाही आधार घेण्यात आला. एका तरुणाने आपण इस्रायलमधील एका छोट्या गावातून आलो असल्याचे सांगत आपल्याला बास्केटबॉलची आवड असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. त्याच्या साध्या आणि सहज संवादामुळे विद्यार्थीही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. या प्रतिनिधींनी विविध खेळ आणि कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांना थिरकायलाही शिकवले.

लेझीमच्या तालावर इस्रायली पाहुण्यांचे स्वागत

विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, सदस्य डॉ. महेश बेडेकर तसेच ए. के. जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अस्मिता मोहिले यांनी इस्रायली पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही पारंपरिक लेझीमच्या तालावर या पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या मानवतावादी संदेश देणाऱ्या गीतातून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांशी आपलेपणाचे नाते जोडले.