गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात झालेल्या नालेसफाई कामांची सुमारे दीड ते दोन कोटींची बिले महापालिकेने थकविल्यामुळे यंदा ठेकेदारांनी ही कामे करणार नसल्याचा पावित्रा घेतला होता. महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम आणि घनकचरा या दोन्ही विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे या ठेकेदारांची बिले अद्याप देण्यात आलेली नाहीत. या मुद्दय़ावरून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासन टीकेचे लक्ष्य होताच अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी या ठेकेदारांची बिले तात्काळ काढण्याचे आदेश दिले. यामुळे यंदाच्या वर्षी नाले साफसफाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील नाल्यांचे पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिका दरवर्षी नालेसफाईच्या कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करते. मात्र निविदा प्रक्रियेच्या गोंधळामुळे दरवर्षी ही कामे काहीशी उशिरा सुरू होतात आणि जून महिन्याच्या अखेरपर्यत चालतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. गेल्या वर्षी मात्र नालेसफाईची कामे लवकर सुरू झाली. शहरातील वेगवेगळ्या भागांतील नाल्यांची ठेकेदारांमार्फत साफसफाई करण्यात आली. मात्र या कामाची बिले संबंधित ठेकेदारांना अद्याप देण्यात आलेली नाही. याच मुद्दय़ावरून स्थायी समितीमध्ये वादळी चर्चा करण्यात आली. या वेळी प्रशासनावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली. महापालिकेने निविदा प्रक्रियेमध्ये नालेसफाईच्या कामांचे फोटो, चित्रीकरण आणि कंट्रोल लेव्हर अशा तीन अटी दिल्या नव्हत्या. पण या कामांच्या करारपत्रामध्ये या तीन अटींचा प्रशासनाने समावेश केला. स्थायी समितीने अशा कोणत्याही अटी घालण्याची मान्यता दिलेली नसतानाही प्रशासनाने अशा अटी ठेकेदारांवर परस्पर लादल्या. असे असतानाही ठेकेदारांनी फोटो आणि चित्रीकरणाच्या अटींची पूर्तता केली असून कंट्रोल लेव्हल तपासणीचा अहवाल दिला नाही. यामुळे बिले अद्याप मिळालेली नसल्याने ठेकेदारांनी यंदा काम करणार नसल्याचा पवित्रा घेतल्याची माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.
नालेसफाईची कामे महापालिकेच्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली झाली असून त्यांनी या कामांची तपासणी केली आहे. असे असतानाही बिले रोखण्यामागचे गणित काय, असा सवाल नगरसेवक संजय भोईर यांनी उपस्थित केला.

समन्वयाचा अभाव
गेल्या वर्षी शहरात झालेल्या नालेसफाईच्या कामांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला असून त्यामध्ये ही कामे समाधानकारक झाल्याचे म्हटले आहे. असे असतानाही ठेकेदारांनी कंट्रोल लेव्हलची अट पूर्ण केली नसल्यामुळे घनकचरा विभागाने ही बिले अद्याप दिलेली नाहीत. महापालिकेकडे स्वत:चे डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्यामुळे गाळ टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे ठेकेदारांनी महापालिकेला कळविले होते. तसेच नालेसफाईनंतर त्याची तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते. तरीही हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत असल्याने ठेकेदारांची बिले रखडली आहेत, असे सांगत सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली.