जयेश सामंत, भगवान मंडलिक

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, टिटवाळा यांसारख्या पट्ट्यात वेगाने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी अशा विकास प्रकल्पांचा मोठा फटका यंदाच्या पावसाळ्यातही या तालुक्यांमधील बहुसंख्य गावांना बसल्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

मुंबई-बडोदा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर झालेले भातशेतीचे संपादन, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भिवंडी, शहापूर भागांत झालेला काही फूट उंचीचा भराव, कल्याण-शीळ मार्गाच्या दोन्ही बाजूस बड्या बिल्डरांच्या नव्या बांधकाम प्रकल्पांची अवतरलेली ‘समृद्धी’ आणि मलंग खोऱ्यातील पाणी वाहून जाण्यात जागोजागी उभे राहात असलेले बांधकाम आणि विकास प्रकल्पांचे अडथळे येथील गावांना तसेच मुख्य मार्गांनाही पुराच्या कवेत घेऊ लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा >>>जाहीरात फलक मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये भागीदारी, मनसेच्या आरोपामुळे खळबळ

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील शेकडो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने शहापूर, भिवंडी तालुक्यातून ठाणे शहराच्या वेशीपर्यत येणारा ‘समृद्धी’ महामार्ग, बडोद्यापासून उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरापर्यत आखला गेलेला मुंबई-बडोदा महामार्ग, कल्याण-अहमदनगर महामार्ग, बदलापूर-कर्जत, कल्याण-बदलापूर मार्गाचा समावेश आहे. कल्याण-शीळ रस्त्याची तुंबापुरी

शीळ-कल्याण मार्गाच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही वर्षांत मोठया प्रमाणावर नागरी संकुले उभी राहिली आहेत.

या वाढत्या लोकसंख्येला पूरक ठरणारे, मेट्रो, उड्डाणपूल, उन्नत मार्गाची आखणीही येथेच सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून या संकुलालगतचे रस्ते पाण्याखाली जात असल्याने पाण्याचा निचरा होणार तरी कसा असा सवाल आता पर्यावरणप्रेमी तसेच नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ विचारू लागले आहेत.

शिळफाटा रस्ता, काटई-बदलापूर रस्ता मागील पाच वर्षापासून पाण्याखाली जाऊ लागला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी गटारेच नाहीत. दुतर्फा बांधकामांच्या रांगा उभ्या राहिल्या आहेत. लगतच असलेल्या दिवा-देसई खाडीत बेकायदा भरावांमुळे समस्या आहे.

महापुराचा फटका बसलेले महामार्ग

कल्याण- मुरबाड महामार्ग (उल्हास नदी पुराचा फटका)

कल्याण-शिळफाटा रस्ता (मलंगगड खोऱ्यातील पाणी)

कल्याण पूर्व नेतिवली ते मलंगरोड-नेवाळी रस्ता. (बेकायदा बांधकामांचा फटका)

मुंबई-बडोदा महामार्ग भरावाचा फटका – टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी, रायते, दहागाव-पोई, गोवेली परिसरातील गावे पाण्याखाली.

नागरीकरण, पायाभूत सुविधा करताना आपत्कालीन या विषयाचा विचार शासकीय यंत्रणांकडून केला जात नाही. या समन्वयाच्या अभावाचे चटके नागरिकांना महापुराच्या माध्यमातून यापुढे बसत राहणार आहेत.- राजीव तायशेट्ये ज्येष्ठ वास्तुशिल्पकार, डोंबिवली.

मुंबई- बडोदा महामार्गासाठी कल्याण तालुक्यातील डोंगरखोऱ्यातील ८० टक्के भात जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे या भागातील नैसर्गिक प्रवाह बंद झाले. त्याचे चटके येत्या काळात महापुरातून परिसरातील गावांना बसणार आहेत.- राम सुरोशी शेतकरी, रायता, कल्याण.