ठाणे : परिवहन उपक्रमातील बसवर जीपीएस यंत्रणा बसवून त्याद्वारे प्रवाशांना बसची थांब्यावर येण्याची अचूक वेळ देता यावी, यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प सहा वर्षांपूर्वी राबविण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नसतानाही ठेकेदाराला चार कोटीपैकी दोन कोटी रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय, बसमध्ये बसविलेली जीपीएस यंत्रणा कालबाह्य झाले असून त्याचबरोबर थांब्यांवर बसविलेले २३ लाखांचे ६८ एलईडी मॉनिटर गायब झाल्याचे ठेकेदाराकडून पालिकेला सांगण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टिएमटी बसगाडय़ांसाठी आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प सहा वर्षांपूर्वी राबविण्याचा निर्णय घेतला. केपीएमजी अॅठडव्हायझरी सर्विसेस या कंपनीला हे काम देण्यात आले होते. ३० जून २०१६ रोजी कंपनीला कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. या कामासाठी चार कोटी ७ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. २२० बसवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार होती आणि त्यासाठी नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार होता. याशिवाय, थांब्यावरील प्रवाशांना बसची अचूक वेळ कळावी यासाठी बसथांब्यांवर एलईडी बसविण्याबरोबरच वेअर ईज माय बस हा अॅयप सुरू करण्यात येणार होता. तीन वर्षांत हे काम पूर्ण करायचे होते. पहिल्या टप्प्यात ५० बसना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती आणि वेअर ईज माय बस हा अॅ प कार्यान्वित करण्यात आला होता. वर्तकनगर येथील निळकंठ भागातील आगारात नियंत्रण कक्ष उभारला होता. या प्रकल्पाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झालेले नसतानाही ठेकेदाराला दोन कोटी ६५ लाख रुपयांचे देयक पालिकेने अदा केले.
सद्यस्थितीत जीपीएस यंत्रणा आणि वेअर ईज माय बस हा अॅ्पही बंदावस्थेत आहे. बसमध्ये बसविलेली जीपीएस यंत्रणा कालबाह्य झाल्याची माहिती ठेकेदारांनेच पालिकेला दिली आहे. यामुळे पालिकेचे दोन कोटी ६५ लाख रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे. याशिवाय, शहरातील विविध टीएमटीच्या थांब्यांवर १०७ एलईडी मॉनिटर बसविण्यात आले होते. त्यापैकी २३ लाख रुपयांचे ६८ मॉनिटर गायब झाल्याची माहितीही ठेकेदाराने पालिकेला दिली आहे. अपालिकेचे साहित्य गायब होऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली दिसून येत नाही.
मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील मिहद्रकर यांनी माहिती अधिकारात हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकल्पामध्ये तब्बल २ कोटी ६५ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतरही पालिका हा प्रकल्प सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगत त्यांनी या घोटाळय़ातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या भ्रष्टाचारा संबंधी पोलीस चौकशी व्हावी यासाठी पत्रव्यवहार केला असून या चौकशीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांसाठी आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प पूर्णपणे सुरू झालेले नसला तरी या प्रकल्पाचे काही अंशी काम सुरू आहे.
-भालचंद्र बेहेरे, व्यवस्थापक, ठाणे परिवहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its project incomplete led monitors missing thane transport bus stand amy
First published on: 24-05-2022 at 01:46 IST