ठाणे – ठाण्यातील जांभळीनाका भाजी बाजारात घाऊक दरामध्ये भाजी मिळते. त्यामुळे अनेकजण भाजी खरेदीसाठी येतात. पण भाजी खरेदी करताना सावधान…. काही भाजी विक्रेत्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रेते मक्याची कणसे गटारातून वाहणाऱ्या पाण्यात धुत असल्याचे समाज माध्यामांवरील व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

जांभळीनाका भाजी बाजार ही ठाण्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून किरकोळ विक्रेते भाजी विक्रीसाठी घेऊन जातात. तसेच ठाण्यातील नागरिक देखील स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने बाजारात खरेदीसाठी जातात. परंतु काही विक्रेत्यांकडून गंभीर प्रकार केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथे वैशाली हॉटेलसमोरील एक विक्रेता मक्याची कणसे गटारातून रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात धुत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या बाजारपेठेत याआधीही भाजीपाला आकर्षक दिसावा म्हणून काही विक्रेत्यांकडून कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्याचे प्रकार समोर आले होते. विशेषतः करले, भेंडी, कंटोला यांसारख्या भाज्यांवर रंग लावल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. सध्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारांमुळे बाजारातील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जांभळी नाका परिसरात, वैशाली हॉटेलसमोरील भागात एका विक्रेत्याकडून मक्याची कणसे रस्त्यावरून वाहणाऱ्या, गटारासारख्या पाण्यात धुतली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.