मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची कडक मोहीम

मीरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे आता हत्यार आले आहेत. शहरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना जागच्याजागी ‘जॅमर’ लावण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकींवर कारवाई होत होती. मात्र आता ‘जॅमर’मुळे चारचाकी वाहनांवरही संक्रांत ओढवणार आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीसांकडून ठिकठिकाणी सम-विषम तारखांनुसार रस्त्यांच्या बाजूला पार्किंगची सुविधा पुरवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर ‘टोइंग व्हॅन’द्वारे उचलून नेल्या जातात व चालकांकडून दंड वसूल करण्यात येतो; परंतु, ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने या वाहनांचे फावत होते. मात्र, आता मीरा-भाईंदर महापालिकेने वाहतूक पोलिसांना २५ ‘जॅमर’ दिले असून आणखी २५ लवकरच दिले जाणार आहेत. याशिवाय अवजड वाहनांवरील कारवाईसाठीही ५० ‘जॅमर’ पुरवण्यात येणार आहेत.
त्यामुळे आता मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा पार्किंग करणाऱ्या चारचाकी वाहनांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अडीचशे रुपये दंड भरल्यानंतरच हे ‘जॅमर’ काढण्यात येणार आहेत, शिवाय विलंब शुल्क म्हणून प्रति दिन पन्नास रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली आहे. ‘नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्यासाठी पोलिसांकडे तीन टोइंग व्हॅन आहेत. त्यामुळे दुचाकींवर नियमितपणे कारवाई केली जाते; परंतु चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग व्हॅन नसल्याने नो पार्किंगमधील कार उचलून नेणे पोलिसांना शक्य होत नव्हते. आता जॅमरच्या मदतीने चारचाकी वाहनांवरही धडक कारवाई करणे शक्य होईल,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.