ठाणे : ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत जम्मू-काश्मीरमधून ठाणे आणि मुंबई परिसरात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा तीन किलो २० ग्रॅम चरस आणि १२ हजार ९८४ ट्रामाडॉल कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपींपैकी एकाने यापूर्वी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात दोन वेळा शिक्षा भोगल्याचे तपासात उघड झाले आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार शहरात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असून त्याअंतर्गत गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक सातत्याने कारवाया करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ड्रग्ज तस्करीच्या हालचाली वाढल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार विविध ठिकाणी गुप्त पाळत ठेवून संशयितांवर नजर ठेवण्यात येत होती.
याच दरम्यान मोठ्या प्रमाणात चरस आणि ट्रामाडॉल कॅप्सूलचा साठा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, पोलिस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ मे २०२६ रोजी रात्री खारेगाव टोलनाका परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली.
या कारवाईदरम्यान गुजरातमधील फिरोज खान (वय ५२) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या मालाची तपासणी केली असता तीन किलो २० ग्रॅम चरस तसेच स्पाझमो प्रॉक्सीव्हॉन नावाच्या औषधातील १२ हजार ९८४ ट्रामाडॉल कॅप्सूल आढळून आल्या. अमली पदार्थांच्या या साठ्याची एकूण किंमत सुमारे ३ कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
फिरोज खान याच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचले. तपास अधिक खोलात नेल्यानंतर या रॅकेटमागे जम्मू-काश्मीरमधील पुरवठादारांचे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवत मोहम्मद अशरफ शेदा (वय ४२) आणि शौकत मीर उर्फ जुबेर (वय ४२, रा. अनंतनाग, जम्मू-काश्मीर) यांना अटक केली. मोहम्मद अशरफ याला १९ मे रोजी, तर शौकत मीर याला ६ जून रोजी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून महाराष्ट्रात अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कोणत्या मार्गाने केला जात होता, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला फिरोज खान हा पोलिसांसाठी नवा चेहरा नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी अहमदाबाद आणि जम्मू येथे ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल असून त्याने अशाच गुन्ह्यांमध्ये दोन वेळा शिक्षा देखील भोगली आहे.
नवी मुंबईतही अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी देखील अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे १० लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तुर्भे परिसरात दोन अल्पवयीन मुलांना अमली पदार्थांची विक्री करताना पकडण्यात आले. या कारवाईत रमेश व सागर कांबळे, दीपिका दांडगे आणि राहुल दांडगे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजाचा साठा जप्त करण्यात आला. तर सीबीडी बेलापूर परिसरात पंजाबमधील तिघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ९ लाख ६० हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. सानपाडा परिसरातील आठ टपऱ्यांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखाही जप्त करण्यात आला आहे.
