कुटुंबसंकुल : सर्वात मोठी तरीही शिस्तबद्ध

या इमारतीत अगदी चिनी भाषिकांपासून ते सर्वधर्मीय लोक राहतात.

 

जयराज नगर, अंबाडी रोड, वसई रोड (प.)

वसईतील सर्वात मोठय़ा सोसायटय़ांपैकी एक असलेल्या जयराज नगरने आपल्या शिस्तबद्ध कारभाराने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सदस्यांचा मालमत्ता कर एकत्रितपणे पालिकेला भरणारी ही एकमेव सोसायटी. १३ विंग असलेल्या ६ इमारतींना एकत्र करून सोसायटीने शिस्तबद्ध आणि नेटका कारभार सुरू ठेवला आहे. एकत्र येऊन पाण्याच्या समस्येवरही तोडगा काढला आहे.

समस्या प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला भेडसावत असतात. जेवढी सोसायटी मोठी तेवढय़ाच समस्या आणि अडचणी मोठय़ा असतात. पण त्यावर सकारात्मकतेने तोडगा काढल्यास सर्व प्रश्न मार्गी लागतात. वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड जवळील जयराज को.ऑप. सोसायटी याचेच उदाहरण आहे. वसईतील मोठय़ा सोसायटय़ांच्या यादीत या सोसायटीची गणना होते. अवाढव्य सोसायटी असूनही सर्वाना एकत्र करून पाण्यासारखे जटिल प्रश्न सोडवले. मात्र तेवढय़ावरच न थांबता सोसायटी वसईतील आदर्श सोसायटी म्हणून नावारूपाला आणली आहे. स्वच्छ पारदर्शक कारभार, नीटनेकेपणा, बी दर्जाचे ऑडिट, सतत ९ र्वष आयएसो प्रमाणपत्र मिळविण्यापासून प्रशासनाकडून गुणवंत सोसायटीचा पुरस्कार पटकावला आहे. एकीचं बळ काय असतं ते या सोसायटीने दाखवून दिलं आहे.

जयराज नगर सोसायटीचे नाव घेताच समोर उभा राहतो तो नवरात्रोत्सव. वसईतील सर्वात जुन्या आणि पारंपरिक नवरात्रोत्सवासाठी वसईत ही सोसायटी ओळखली जाते. ६ इमारती आणि तब्बल १३ विंग असलेली जयराज नगर सोसायटी ही वसईतीलल सर्वात मोठय़ा सोसायटीपेक्षा एक सोसायटी आहे. १९९१ साली वसई मुंबईतील सुविधा बिल्डरने ही सोसायटी उभारली. या इमारतीत तब्बल ९७ व्यावसायिक दुकाने आणि २२७ सदनिका आहे. वसईतलं प्रसिद्ध ग्रीन हाऊस रेस्टॉरंट, पुल क्लब, विविध कपडय़ांची शो रूम्स, खाद्यपदार्थाची हॉटेल्स या इमारतीत आहेत. या इमारतीत अगदी चिनी भाषिकांपासून ते सर्वधर्मीय लोक राहतात.

१९९० च्या वसईत पाण्याची समस्या असताना त्याची झळ जयराज नगरला बसली. पाण्याची एकच जोडणी सुरुवातीला होती. महिन्याला २०० हून अधिक टॅंकर्स पाणी लागत असे. सोसायटीची सुरुवातीची र्वष हलाखीची गेली. २००२ साली नवीन कार्यकारिणी निवडून आली. त्यांनी पाण्याचा प्रश्न हाती घेतला. सहा इमारतींची स्वतंत्र सोसायटी न बनवता एकाच सोसायटीखाली एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पाण्यासाठी तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून एका नळ जोडणीवरून तब्बल २५ नळजोडण्या घेण्यात आल्या. तरी पाण्याची समस्या राहू नये यासाठी विंग खाली कल्पकतेने पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. आज प्रत्येकी १० हजार लीटर क्षमतेच्या ६ टाक्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोसायटीला कधीच पाण्याची समस्या भेडसावत नाही.

सोसायटीचे सरचिटणीस अशोक उद्यवर असून चंद्रकात रूपारेलिया हे अध्यक्ष आणि उदय गुरव खजिनदार आहेत. कार्यकारिणीत १२ सदस्य आहेत. या कार्यकारिणीने नियोजनबद्ध काम करण्यास सुरुवात केली. कुठलेच काम नियमाबाहेर करायचे नाही आणि सर्व व्यवहार चोख आणि पद्धतशीर ठेवण्यावर भर दिला. ऑडिटमध्ये सोसायटीला बी क्लास दर्जा मिळाला आहे. तसेच गेल्या ९ वर्षांपासून सतत आयएसओ प्रमाणपत्र मिळत आहे. सोसायटीवर कधीच प्रशासक नेमण्यात आला नाही. कार्यकारिणीवर सदस्य समाधानी आहेत. त्यामुळेच मागील तीन टर्मपासून कार्यकारिणी देखील बिनविरोध निवडून येत आहे.

शिस्तबद्ध सोसायटी

सोसायटीने हिरवाई जपत आवाराच्या मध्यभागी उद्यान फुलवले आहे. त्याची देखभाल ठेवण्यासाठी खास माळी ठेवला आहे. वाहनतळासाठी आवारात स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे पार्किंगच्या मुद्दय़ावरून वाद होत नाहीत. इमारतीचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. अग्निसुरक्षा करवून घेण्यात आली आहे. सोसायटीत कमालीची स्वच्छता पाळली जाते. त्यामुळे २००७ साली नवघर माणिकपूर नगरपरिषदेचा गुणीजन गुणवंत सोसायटीचा पुरस्कार देखील सोसायटीला मिळाला होता. सोसायटीच्या छतावर बहुतांश सोसायटींकडून पत्रे लावले जातात. मात्र तसे करणे अधिकृत नसल्याने सोसायटीने तसे पत्रे लावलेले नाहीत. यंदा मात्र रेन हार्वेिस्टग केले जाणार आहे.

पालिकेला सहकार्य

जयराज सोसायटीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पालिकेला करत असलेले सहकार्य. ही सोसायटी सर्व सदस्यांचा मालमत्ता कर एकत्रिपण बिल आल्या आल्या पालिकेला जमा करते. ५ लाख  १० हजार रुपयांचा हा मालमत्ता कर भरला जातो. तो नंतर सदस्यांकडून मासिक बिलातून गोळा केला जातो. अशा प्रकारे सर्व सोसायटय़ांचा मालमत्ता कर भरणारी ही एकमेव सोसायटी ठरली आहे. पालिकेच्या पाण्याचे ४ लाखांचे बिलसुद्धा एकरकमी भरले जाते. सोसायटीवर कुठल्याच प्रकारची थकबाकी नाही. सोसायटीची कामे करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

सोसायटीच्या विकासासाठी विविध योजना राबिवण्याचा कार्यकारिणीचा संकल्प आहे. एकत्र राहून सामोपचाराने कार्य केले की समस्या दूर होतात या भावनेने ही सोसायटी वाटचाल करत आहे.

उत्सवांची सोसायटी

सोसायटीत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. पण नवरात्रोत्सव सर्वात मोठय़ा स्तरावर होतो. त्यामुळे जयराज नगर ही सोसायटी नवरात्रोत्सवासाठी प्रसिद्ध झाली आहे. गुजराथी लोकांचं प्राबल्य असल्याने पारंपरेला आधुनिकतेची जोड देऊन हा उत्सव साजरा होतो. गणेशोत्सव मात्र दीड दिवसांचा होतो. हे सर्व सण नियमांच्या चौकटीच राहून केले जातात. उत्सवासाठी सर्व सदस्यांच्या मासिक बिलातून विशिष्ट रक्कम आकारली जाते. त्यामुळे कुणावर आर्थिक बोजा पडत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jayraj nagar big housing society in vasai west

ताज्या बातम्या