scorecardresearch

Premium

दुर्बलांना सबळ बनवणारे ज्ञानमंदिर

शाळेत येणारे विद्यार्थी हे समाजातील कष्टकरी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत.

दुर्बलांना सबळ बनवणारे ज्ञानमंदिर

‘आमच्या जिजाई बालमंदिर (ठाणे पूर्व) शाळेत येणारे विद्यार्थी हे समाजातील कष्टकरी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत. बहुसंख्य घरातून दिवसभराच्या कमाईवरच संध्याकाळची चूल पेटते. अशिक्षितता आणि व्यसनाधिनता हा प्रत्येक घराला मिळालेला अभिशापच आहे. परिणामी घरातील स्त्रीवरच संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडते. बरेच विद्यार्थी हे एकल पालकत्व असलेले आहेत. असेही विद्यार्थी आहेत की आई किंवा बाबा नसल्याने आजी-आजोबांकडे राहतात. त्यांच्या अनेकविध अडचणींमुळे, परिस्थितीमुळे शिक्षणासाठी आवश्यक अशा पोषक वातावरणाचा इथे अभाव दिसून येतो. उदासीनता अनुभवता येते. अशा विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या जगण्याची, त्यांच्या प्रश्नांची आपण कल्पनाही करू शकत नाही. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना प्रत्येक कुटुंबाला जवळून अनुभवता येते आणि मग त्यांचे अनुभव आपल्याला अस्वस्थ करतात, सुन्न करतात. मध्यवर्ती ठाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या शाळेत आपल्याला जगण्याचे विरूप प्रतिबिंब अनुभवता येते. या पाश्र्वभूमीवर या मुलांच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे जिजाई बालमंदिर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि छत्रपती शिक्षण मंडळ (कल्याण) या संस्थेचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते.

‘मागेल त्याला शिक्षण’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आणि ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरवीत ७३ पासून ठाणे पूर्व भागात शैक्षणिक कार्य सुरू आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता ही वाटचाल किती आव्हानात्मक आहे याची प्रकर्षांने जाणीव होते. या शाळेमध्ये शांतीनगर, आनंदनगर, पारशीवाडी, सिद्धार्थनगर या वस्तीमधून विद्यार्थी येतात. कोपरी पोलीस स्टेशनजवळील राजनगर (खाडीची मागची बाजू) या वस्तीमधील विद्यार्थी येतात. त्याचप्रमाणे जुना कापडबाजारातील दिवा, कळवा, मुंब्रा येथून येणाऱ्या विक्रेत्यांची मुलेही येतात. कोपरी वसतिगृहाजवळ साधारण पक्क्य़ा स्वरूपाची घरे आहेत आणि शांतीनगर वगैरे भागात आत गेल्यावर ताडपत्री किंवा प्लॅस्टिक घातलेली, पत्र्याची अशी घरे दिसून येतात. या वस्त्यांमधून सर्वेक्षण करून या शाळेने प्रयत्नपूर्वक विद्यार्थी शाळेत आणले आहेत. याच प्रयत्नांमधून कचरावेचक महिलांची १५ मुले या शाळेत दाखल झाली आहेत. मनसोक्त हुंदडणाऱ्या या मुलांना शाळेच्या वातावरणात रुळवण्यासाठी शिक्षकांना काही काळ प्रयत्न करावे लागले पण अल्पावधितच त्या प्रयत्नांना यशही प्राप्त झाले आहे. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, सातत्य राहावे म्हणून शाळेने स्वखर्चाने रिक्षा लावली आहे. खरं तर या सर्व पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थ्यांच्या प्राथमिक सोयीसुविधांची पूर्तता करण्याचे कामही संस्थेलाच करावे लागते. गणवेश, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क यासाठी समाजाकडून आर्थिक सहकार्य प्राप्त होते.  ठाण्यातील ज्योती जपे, पत्की आणि वृंदा टिळक या तिघी जणी विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभागी होणाऱ्या.

gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

त्यांना कष्टकरी वर्गातील महिलांसाठी विशेषत: माता पालकांसाठी उपक्रम राबवण्याची निकड वाटत होती. या वर्गातील मुलांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने या माता पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. शाळा, शिक्षक, समाज या विद्यार्थ्यांसाठी आपापल्या परीने प्रयत्नशील आहे आणि आज त्यादृष्टीने अनेक शैक्षणिक उपक्रम गावोगावी राबवले जात आहेत. या प्रयत्नांना पूरक म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून या पालकांना मार्गदर्शनपर (जाणीव जागृतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून) असा पालकशाळेचा आराखडा एका शैक्षणिक वर्षांच्या दृष्टीने त्यांनी निश्चित केला. या दृष्टीने जिजाई बालमंदिर शाळेशी बोलणी सुरू केली, भूमिका स्पष्ट केली आणि मुख्याध्यापिका रेश्मा देशपांडे यांनी होकार दिला. कारण त्यांनाही पालकांसाठी तज्ज्ञांमार्फत प्रबोधनाची, मार्गदर्शनाची गरज जाणवत होती. इथे इतर शाळा आणि या शाळेतील पालकशाळेमधील फरक लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या, दररोज नित्यनवीन समस्यांना सामोरे जाणाऱ्या पालकांना पालकशाळेचे महत्त्व त्यांच्या पातळीवर जाऊन, त्यांना भावेल, समजेल अशा तऱ्हेने सांगणे, त्यांची उपस्थिती मिळवणे  (कारण एक खाडा त्यांना परवडणारा नसतो.) आणि त्यासाठी शाळा आणि मार्गदर्शक यांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागणार होते. पण या शाळेने जो पालकांचा विश्वास संपादन केला आहे तो इथे उपयुक्त ठरला. पालकशाळेचे पहिले सत्र हे एकमेकांशी ओळख अशा स्वरूपाचे होते. इथे जपे, पत्की आणि टिळक मॅडम यांनी माता पालकांना बोलते केले आणि आपण सर्व जणी कशासारख्या आहोत असे संवादातून सांगताना अंतरही सहज कमी करून टाकले. प्रत्येक पालकाने कामाचे स्वरूप सांगायचे हे सांगताना त्यांच्या श्रमांचे महत्त्व पटवून दिल्याने, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने आत्मविश्वासही मिळवून दिला.पालकशाळेचे दुसरे सत्र आहार या विषयावर घेण्यात आले आणि पहिल्या सत्राप्रमाणे पालकांशी गप्पा मारत, संवाद साधत, सहभागी करीत दुसरे सत्र छान पार पडले. खरंतर रोजचा चटणी, कोशिंबीर, भात, भाजी, पोळी, आमटी (भाजी- पालेभाजी/फळभाजी/उसळ) असा आपला आहार हा खरंतर आरोग्याचा विचार करता आदर्श म्हणावा असाच आहे.

मार्गदर्शक वृंदाताई टिळक यांनी या पालकांना जमू शकेल (सगळ्या परिस्थितीचा विचार करता) त्यांना ते करायला सोपे जाईल आणि विषय बोजड वाटणार नाही या पद्धतीने मांडला. प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, उष्मांक असे कठीण शब्द न वापरता, गहू, तांदूळ, डाळी किंवा एकादा पदार्थ आणि त्यातील विविध घटक यांची माहिती पालकांकडूनच घेतली आणि मग संवाद साधताना त्याचे महत्त्व सहज सोप्या रीतीने सांगून टाकले. माझ्या लहानपणी शिंकाळ्यात भाकरी ठेवली असायची जी न्याहारीला लोक खायचे. मग ब्रेड, बिस्कीट विकत आणण्यापेक्षा पोळी/भाकरी आदल्या दिवशीची आहारात उपयोगात आणावी असे त्यांनी सुचविले. गव्हाचे, कोंडय़ाचे महत्त्व, हातसडीचा किंवा सिंगल पॉलिशवाला तांदळाचे महत्त्व सांगितले. गव्हात कोंडय़ाचे जे सात थर असतात ते मैद्यात पूर्णपणे काढले जातात म्हणून मैदा टाळावा. कडधान्ये शक्यतो मोड आणून किंवा रात्री भिजत टाकून सकाळी उसळ करावी. पालेभाजी ७ मिनिटातच शिजवणे हे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते हे सगळे त्यांना समजेल या पद्धतीने सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्य़ात मिळणारे नाचणी, नागली, वरी व त्याबरोबर राजगिरा, कुळिथ, शिंगाडा हे का खावे ते समाजावून दिले. स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यायची (उसळी शिजवून, भाजी कमीत कमी पाणी घालून, झाकण ठेवून शिजवावी इ.) याचे वृंदाताईंनी छान मार्गदर्शन केले. पालकांनाच खिचडी करताना डाळ साधी की सालीची, पराठय़ात कोणत्या भाज्या वापराव्यात, भाज्यांच्या सालींचा कसा वापर करावा असे प्रश्न विचारून सतत सहभागी केले. पालकांचा उत्साहवर्धक सहभाग सर्वाना हुरूप देणारा होता.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-10-2016 at 02:36 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×