scorecardresearch

“ठाण्यात कोणाचं लग्न झालं, मुलगा झाला तरी श्रेय घ्यायची सवय”, फडणवीसांच्या आरोपावर जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

“ठाण्यात कोणाचं लग्न झालं, मुलगा झाला तरी श्रेय घ्यायची सवय”, फडणवीसांच्या आरोपावर जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

ठाण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाले तरी त्याचे श्रेय घ्यायची सवय लागली आहे, असा टोला महाविकासआघाडीला लगावला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे काही अपेक्षित नाही, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी असं बोलावं लागतं, असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीच्या कार्यलयाच्या उद्घाटनासाठी डोंबिवलीमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काही बोलावं हे अपेक्षित नाही. ठाण्यात श्रेयवादाची लढाई आहे असं मला कधीही दिसलं नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी असं बोलावं लागतं.”

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा कायदा आमच्या सरकारच्या काळात झाल्याचा दावा करत सर्वजण आता त्याचे श्रेय घेत असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही लोकांना लागल्याचा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. ठाण्यात शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, तोच गुन्हा ‘मातोश्री’नं केला”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

“आम्ही फक्त शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय”

“जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी भाजपा आमदार संजय केळकर यांनीच पाठपुरावा केला होता आणि आमच्या सरकारच्या काळात त्याबाबतचा कायदा तयार करण्यात आला होता. परंतु हा कायदा मंजूर होण्यासाठी एक वर्षाचा काळ का लागला?” असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. “गेल्या काही दिवसांपासून काही लोक आमच्याच प्रेरणातून कामे झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही जणांना लागल्याची” टीकाही त्यांनी केली. “आम्ही केवळ शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय आणि अन्यायाविरोधात संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहोत”, असेही ते म्हणाले.

Shiv Jayanti 2022 : जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही – फडणवीस

“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत…”

ठाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा गौरवर केला. “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा तुम्ही हा भगव्याचा जो अलख निर्माण केला आहे, हा भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2022 at 20:36 IST
ताज्या बातम्या