ठाणे : जंतर-मंतरवरील आंदोलनाने काय साध्य केले, असा प्रश्न कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली. ‘झेन झी’ पिढीने हास्य-विनोदाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे नवे तंत्र राजकारणाला शिकवले, असा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यापुढे ‘जय भीम’ हाच शब्द नमस्कार आणि हॅलोच्या ऐवजी वापरला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी शहरातील जयभगवान हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २०१४ पासून अनेकांच्या मनात इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती निर्माण झाली होती. मात्र, आपल्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, याची जाणीव असलेल्या ‘झेन झी’ पिढीने घाबरून न जाता लढण्याचा मार्ग स्वीकारला. हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान अनेकांनी सांगितले. मात्र या तरुण पिढीने हास्य-विनोदाच्या माध्यमातून दहशतीला उत्तर देण्याचे नवे तंत्र दाखवून दिले, असे ते म्हणाले.

पोलिसांकडून मारहाण झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्याच पोलिसाजवळ जाऊन ‘अंकल, आज भी मारोगे’, असा मिश्कील सवाल करण्याची मानसिकता या तरुण पिढीने दाखवली. दहशत संपवायची असेल तर हास्य-विनोदाने ती संपवा, असा संदेश या पिढीने दिला. या तरुणांनी केलेल्या उपहास आणि विनोदामुळे एका पक्षाची आणि एका व्यक्तीची दहशतच संपली, असा दावा आव्हाड यांनी केला. २०१४ मध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून राजकीय प्रचाराचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. मात्र २०२६ मध्ये इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर सक्रिय झालेल्या तरुण पिढीने राजकीय समीकरणे बदलली असल्याचे सांगितले. ‘इन्स्टाग्राम’वरील तरुणांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून निर्माण झालेली दादागिरी संपुष्टात आणली, असा टोला त्यांनी लगावला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. मात्र, शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्यामुळेच आजची तरुण पिढी संघर्षासाठी रस्त्यावर उतरली आहे, असेही आव्हाड म्हणाले. यापुढे ‘जय भीम’ हाच शब्द नमस्कार आणि हॅलोच्या ऐवजी वापरला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मनोज प्रधान हे कार्यकर्त्यांमधील बापमाणूस असून कार्यकर्ते गोळा करणे आणि संघटना वाढविण्याचे कौशल्य त्यांच्याइतके कोणाकडेही नाही. १९८७ पासून आपण आणि प्रधान मित्र आहोत. प्रधान हे कार्यकर्ते जोडणारे लोहचुंबक आहेत. त्यांच्याप्रमाणे गोड शब्दांत संवाद साधणे आपल्यालाही जमत नाही, असे आव्हाड म्हणाले.

नगरसेवक संख्या वाढविण्याचा निर्धार

‘पक्षाने मला काय दिले’ असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारण्यापेक्षा ‘मी पक्षासाठी काय केले’ याचा विचार करावा, असे आवाहन मनोज प्रधान यांनी केले. बदलत्या राजकीय वातावरणाचा फायदा घेत कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचावे आणि दररोज दोन-तीन नवीन कार्यकर्ते जोडावेत, असे त्यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आपण पुन्हा राजकारणात सक्रिय झालो, असे सांगत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक १२ वरून ५० करण्याचा निर्धार व्यक्त केला.