scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांना वाटते अख्खे ठाणे त्यांच्या हातात असावे, पवारांनी एवढे वर्ष राजकारण केले, पण..” जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सीएम नाहीत व्हॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हॉईसरॉय कसा हातात कायदा असतानाही कोणाचेही ऐकायचा नाही, तसे हे व्हॉईसरॉय आहेत, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“मुख्यमंत्र्यांना वाटते अख्खे ठाणे त्यांच्या हातात असावे, पवारांनी एवढे वर्ष राजकारण केले, पण..” जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना टोला
लोकसत्ता ग्राफिक्स

नवी मुंबई : सीएम नाहीत व्हॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हॉईसरॉय कसा हातात कायदा असतानाही कोणाचेही ऐकायचा नाही, तसे हे व्हॉईसरॉय आहेत, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर चौफेर टीका करत ठाणे फक्त स्वतःचे असावे, असा तोरा मुख्यमंत्र्यांचा असल्याचा दावा केला.
 
नवी मुंबईतील नेरूळ येथे माजी नगरसेवक व नवी मुंबईचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला बुधवारी सुरवात झाली असून, उद्घाटन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी आपल्या भाषणात राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

हेही वाचा – ठाणे : मेट्रोचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्यू

नवी मुंबईच्या निवडणुका येतील, नशीब मतदान पोलीस करत नाहीत, एवढेच राहिले आहे आता, नाहीतर सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू, असे सांगत आव्हाडांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना होणाऱ्या विलंबाबाबत टीका केली. तीनचा वॉर्ड असावा, असे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री असताना नक्की झाले होते, पंधराशे कोटी रुपये खर्च झालेत, आता म्हणतात चारचा वॉर्ड करा. आपल्या घरचा पैसा जाणार नाही म्हणून काहीही करावे का? कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे, त्यामुळे आम्ही सांगू तो कायदा तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात राबवला जात आहे, असे आव्हाड म्हणाले.

ठाण्यात टिपून टिपून मारतात तसे टिपून टिपून मारत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटते अख्खे ठाणे त्यांच्या हातात असावे, पवारांनी एवढे वर्ष राजकारण केले संपूर्ण बारामती त्यांचे होऊ शकले नाही, असा टोला आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

हेही वाचा – लोकल ट्रेनमधून ओढत बेदम मारहाण केल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबईत होणाऱ्याला निवडणुकीला धरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोणालाही इथे तिथे जाऊ न देता सगळ्यांची घट्ट मोट बांधा. मिळालेल्या नगरसेवकांना निरोप द्या. प्रचाराला जितेंद्र आव्हाडाची गरज लागणारच आहे. मी आणि आनंद परांजपे दोघेही आलो असताना नगरसेवकांनी दांड्या मारणे हे काही योग्य नाही, अशा कानपिचक्याही आव्हाड यांनी अनुपस्थित नेत्यांना दिल्या.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 11:25 IST

संबंधित बातम्या