ठाणे, कळवा, खारेगाव, मुंब्रा पट्टयात चौपाटी उभारण्यासाठी हटवावी लागणारी अतिक्रमणे वाचवण्यासाठी एकीकडे शिवसेना नेत्यांची धावाधाव सुरू असताना या मुद्दय़ावर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. या पट्टय़ात चौपाटी उभारण्यासाठी कळव्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आग्रही असतानाच, मुंब्रा खाडीकिनारी झालेली अतिक्रमणे हटवण्यास नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केला आहे. अतिक्रमणे वाचवण्यासाठी प्रयत्न चालवणारे शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांनी गणेश नाईकांना आपल्या कंपूत सामील करून घेतल्याचे समजते. त्यामुळे संतापलेल्या आव्हाडांनी ‘नाईकांनी नवी मुंबई पाहावी. येथे आम्ही समर्थ आहोत,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.  
राज्य सरकारने रेती-उपशावर बंदी घालूनही ठाणे, मुंब्र्याच्या खाडीत अजूनही अमर्याद असा रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी बेकायदा रेती-उपसा करणाऱ्या माफियांविरोधात कारवाई केली असली तरी कारवाईनंतर रेतीउपसा पुन्हा सुरू होतो. याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच या कळवा, मुंब्रा, खारेगाव पट्टय़ाचे सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने येथे चौपाटी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या चौपाटीच्या उभारणीत मुंब्रा खाडीकिनारी झालेल्या ७५०हून अधिक अतिक्रमणांचा अडथळा आहे.   व्यावसायिकांनी ही कारवाई टळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कास धरली आहे. आव्हाडांचे कट्टर प्रतिस्पर्धी दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकवटली आहेत. त्यामुळे या मुद्याला आता आव्हाड विरुद्ध पाटील असा रंग चढू लागला आहे. असे असताना दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात गणेश नाईक यांनी उडी घेतली. अतिक्रमणे हटवण्यापूर्वी रेती व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. नाईक आणि दशरथ पाटील यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यातूनच नाईक यांनी पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समजते. मात्र, यामुळे नाईक आणि आव्हाड यांच्यातील दरी मात्र रुंदावली आहे. मध्यंतरी नाईक यांनी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्याशी जुळवून घेतल्याने आव्हाड आणि नाईक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून विसंवादाचे वारे वाहू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर नाईक स्वत: कळव्याच्या खाडीकिनारी उतरल्याने हा विसंवाद टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंबंधी गणेश नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-खारेगाव पट्टय़ातील रहिवाशांसाठी चौपाटी होत असेल तर त्यामध्ये आडकाठी आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  
जयेश सामंत, ठाणे