ठाणे : दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असून या बाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधाने करण्यात येत आहे. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोणतेही विधान केले होते. दरम्यान, आव्हाड यांनी आता विलीनीकरणबाबत भाष्य केले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आव्हाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते, त्यामुळे भेट झाली नव्हती. माझ्या मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबित होती. त्या कामांबाबत निर्णय घेण्यासाठीच मी त्यांच्याकडे गेलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चांवर त्यांनी सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. अजून त्यावर चर्चा नाही, निर्णय नाही. ‘आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं’ अशा कल्पनांवर राजकारण चालत नाही, असे म्हणत त्यांनी तर्कवितर्कांना फाटा दिला. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा देण्यात येत असून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते एकटेच निवडून आले होते, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब असल्याच्या संशयावरून झालेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणालाही कोणत्याही गोष्टीचा संशय येऊ शकतो. त्यावर आपण काय करणार, असे ते म्हणाले. कोणीतरी संशय घेणार, कोणीतरी तो खोडून काढणार. त्यावर मी उत्तर देत बसलो तर तुम्हालाही वेळ कमी पडेल आणि मलाही, असे सांगत त्यांनी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयांबाबत बोलताना थेट उत्तर देणे टाळले.

दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणच्या कुठल्याही बैठकीत मला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. मी त्या चर्चेचा भागच नव्हतो. त्यामुळे विलीनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, असे सांगत आव्हाड यांनी सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी कुठल्याही बैठकीत सहभागी नसेन आणि मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे विलीनीकरणाबाबत माझ्याकडे काहीही माहिती नाही. हे अगदी स्पष्टपणे टीव्हीवर दाखवा, असे आव्हाड म्हणाले.