ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते. सहर यांनी केलेल्या विधांनामुळे तिच्यावर टीकाही झाली होती. असे असतानाच, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांची रॅली अन् सभा मुंब्र्यात आज, मंगळवारी होणार असून ते या सभेतून सहरला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान, सहर शेखने माफीनामा लिहून दिला होता. माफिनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण दप्तरी नोंदवण्यात आले होते. याच दरम्यान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात येऊन सहर ची भेट घेत तिच्या विधानाचे समर्थन केले होते. यानंतर माफीनामा नव्हे तर विधानाचे स्पष्टीकरण दिल्याचे सहरने म्हटले होते.

ठाणे महापालिका निवडणुकीत आमदार आव्हाड यांनी सहरला उमदेवारी नाकारली. यामुळे तिने एमआयएम पक्षाची उमेदवारी आणून निवडणूक लढवली. यात विजय झाल्यानंतर ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य करत तिने आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते.

दरम्यान, सहार शेख प्रकरणानंतर आज, मंगळवारी मुंब्र्यात राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्या वतीने विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार करण्यात येणार असून, दर्गाह गल्ली येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५:३० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानक येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप दर्गाह गल्ली येथे होईल. त्यानंतर दर्गाह गल्ली येथे आयोजित सभेत जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करणार आहेत.