ठाणे : राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड हे नेहमी त्यांच्या विधानावरून चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. आव्हाड यांच्या ट्विट नंतर समाज माध्यमावर सध्या चर्चा सुरू आहे.
ठाणे शहरातील घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात ठाणे – बोरीवली बोगद्याच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या कामामुळे होणारे प्रदूषण आणि इतर समस्यांविषयी नागरिक त्रस्त आहेत. मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येथील रहिवाशांनी भेट घेतली. त्यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. रहिवाशांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर संकुलाच्या भिंतीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानंतर आव्हाड यांनी समाजमाध्यमावर एक ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘ठाणे- बोरीवली बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्याच्यासंदर्भात रविवारी मुल्ला बाग परिसरातील नागरिकांनी मला चर्चा करण्यासाठी बोलावले होते. तेथील रहिवाशांची प्रमुख मागणी अशी होती की, तो येणारा बोगदा युनिबॅक्स कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत आणावा. पण, माझे म्हणणे असे आहे की, हा बोगदा थेट घोडबंदर रोडपर्यंत घेऊन जावा. जेणेकरून परिसरातील रहिवाशी संकुलांना कोणताही त्रास होणार नाही.
रविवारी बैठक झाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबधित लोकांना बोलावून हा बोगदा थोडासा पुढे नेण्याच्या सुचना केल्या. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र, लोकांनी मागणी केलीच आहे तर तो बोगदा थेट घोडबंदर रोडलाच जोडावा. जेणेकरून पुढील काळात रहिवाशांना होणारा धुळीचा त्रास आणि पर्यवरणीय असमतोल टाळता येईल. पण, माझ्या भेटीमुळे एवढा परिणाम होऊ शकतो, याचे मलाच आश्चर्य वाटते. सहा महिने ते रहिवाशी मागे लागले होते; निर्णय होत नव्हता. रविवारची एक बैठक काय झाली, जादूची कांडीच फिरली. #आभारएकनाथशिंदे साहेब’ असे म्हटले आहे. या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.