कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवक महोत्सवात झोन-६ मधील सर्वंकष चॅम्पियनशिप पटकावून कल्याणजवळील गोवेली येथील जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखली. या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.

जीवनदीप महाविद्यालयाने ५९व्या युवक महोत्सवाच्यानिमित्त कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन विश्वस्तांचा मुंबई विद्यापीठाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, समन्वयक डॉ. निलेश सावे या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

युवक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला व नेतृत्वक्षमतेला व्यासपीठ मिळते. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाने झोन-६ मधील सर्वंकष चॅम्पियनशिपमध्ये आपले नाव उज्जवल केले. ५९व्या युवक महोत्सवाच्या कार्यशाळेचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन केल्यामुळे महाविद्यालयाच्या कार्याची मुंबई विद्यापीठाने दखल घेतली.

या दुहेरी यशाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सतीश लकडे, प्रा. मयुरी कांबळे, प्रा. संकेत कुलकर्णी, सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली ही दाद म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील आणखी एक अभिमानास्पद पर्व आहे, अशी मते उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या साहित्य, सांस्कृतिक कलागुणांना, क्रीडाविषयक कौशल्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून जीवनदीप महाविद्यालय तज्त्र मंडळींना पाचारण करते. त्यांच्या मार्गदर्शन अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. या विशेष प्रयत्नातून विद्यार्थी यशाची भरारी घेतात, असे जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.