नोकरी, कामधंदा नसल्याने डोंबिवलीतील चार तरुणांच्या टोळक्याने झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टोळक्याने मानपाडा रस्त्यावरील एका फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या नातेवाईकांकडे ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही तर व्यावसायिकाला मारण्याची धमकी दिली.

व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडला प्रकार ऐकल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली. उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

अपहरण करणाऱ्यांच्या मोबाईलवर लक्ष ठेऊन तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी, पडघा, शहापूर असा प्रवास करत खंडणी मागणारे टोळके व्यावसायिकाला विविध ठिकाणी फिरवत होते. पोलिसांना गुंगारा देतानाच खंडणीची रक्कम स्वीकारण्याच्या प्रयत्नात असताना खंडणी मागणारे टोळके साध्या वेशातील पोलिसांच्या जाळ्यात सापडले आणि त्यांचे धनवान होण्याचे, ऐषआरामी जीवन जगण्याचे स्वप्न भंग पावून ते अखेर पोलीस कोठडीतील हवा चाखण्यासाठी रवाना झाले.

डोंबिवलीतील आरोपी

संजय रामकिशन वर्मा (३९), संदीप ज्ञानदेव रोकडे (३९), धर्मदाज अंबादास कांबळे (३६), रोशन गणपत सावंत (४०) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व डोंबिवलीतील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून पाच लाख ३२ हजार रुपये किमतीची झायलो कार, चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

अपहरण नाट्य

पोलिसांनी सांगितले, हिम्मत शेषमल नाहर (३२) यांचा मानपाडा रस्त्यावरील स्टार काॅलनी येथे डिलक्स प्लायवुड फर्निचर सामान विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील संजय विश्वकर्मा हा दुकानात प्लायवुड खरेदीच्या बाहण्याने आला. त्याने तीन लाख रुपयांचे प्लायवुड खरेदी केले. परिचित असल्याने तो पैसे देईल असे हिम्मत नाहर यांना वाटले. संजयने हिम्मत यांना बाजुच्या एटीएममधून व्यवहाराचे पैसे काढून देतो असे सांगितले. त्याच्या सोबत हिम्मत भाई गेले. तेथील एटीएम बंद आहे असे खरेदीदार संजयने हिम्मत यांना सांगून आपण पुढे जाऊन एटीएममधून पैसे काढू असे सांगितले. पुढे जाताच संजयने त्यांना एका गाडीत बसण्यास सांगितले. ते बसताच वाहनातील आरोपींनी हिम्मत भाईं जवळील मोबाईल काढून घेऊन वाहन सुसाट शहराबाहेर काढले. आपले अपहरण होत आहे याची जाणीव हिम्मत यांना झाली.

दुकान उघडे टाकून मालक गेले कोठे म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बुधवारी रात्री साडे नऊ वाजता हिम्मत यांचा पुतण्या जितू नाहर यांच्या मोबाईलवर चार वेगवेगळे मोबाईल फोन येऊ लागले. त्यांनी हिम्मत नाहर आमच्या ताब्यात आहेत. ते सुखासुखी परत हवे असतील तर आम्हाला ५० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. हे पैसे कोठे जमा करायचे हे आम्ही तुम्हाला कळवितो, असे सांगून खंडणी मागणारे मोबाईल बंद करत होते.
जितू नाहर यांनी मानपाडा पोलिसांना घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास पथके तयार केली. अपहरणकर्ते ज्या भागातून मोबाईल करत होते पोलीस त्या मार्गावर त्यांचा पाठलाग करत होते. हिम्मत यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ याची काळजी घेतली जात होती. दिवसभर अपहरणकर्ते विविध ठिकाणे देऊन जितू यांना ५० लाख घेऊन बोलवत होते. ते सतत आपली ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील गोठेघर गावा जवळील पुलाजवळील बोगद्या जवळ तुम्ही खंडणीची रक्कम घेऊन या असे अपहरणकत्यार्ंनी जितूना सांगितले. तात्काळ पोलिसांनी गावाकडील साधा पेहराव करुन बोगद्या भोवती सापळा लावला.

ठरल्या वेळेत जितू पैशाची पिशवी घेऊन बोगद्या जवळ पोहचला. तेथे काही क्षणात एक झायलो कार आली. कार मधील इसमाने इशारा करताच जितू वाहना जवळ गेला. त्याने पहिले हिम्मत काकाचा ताबा द्या मग पैसे देतो असे सांगितले. त्यावेळी इसमांनी त्यांना आम्ही गोठेघर गावात एका घरात ठेवले आहे असे सांगितले. पैसे घेण्यासाठी अपहरणकर्ते आग्रही होते. जितू यांनी हिम्मत यांची पहिली सुटका करा अशी मागणी होती. यावेळी जितू, अपहरणकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. जितू यांनी इशारा करताच साध्या वेशातील मानपाडा पोलिसांनी झायलो वाहनाला घेराव घातला.

वाहनासह जितू, पोलीस गावात गेले. तेथे एका घरात हिम्मत यांच्यासह अन्य एकाला पलंगाला दोरीने बांधून ठेवले होते. पोलिसांनी दोघांची सुटका केली. चारही अपहरणकर्त्यांना अटक केली. एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.
झटपट श्रीमंत होण्यासाठी हिम्मत यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली.