डोंबिवली : कैलास-मानसरोवर यात्रेवरून ४३ भारतीय भाविक सुखरूप मायदेशी परतले; मात्र यात्रेदरम्यान नेपाळ-चीन परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीची धक्कादायक माहिती कळाल्यानंतर या आनंदावर दुःखाची छाया पसरली. ‘महादेवाच्या कृपेने आम्ही सुखरूप परतलो; पण ज्यांनी आमची सेवा केली, त्यांची आठवण कायम मनात राहील,’ अशी भावना नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या डोंबिवलीतील प्रकाश माने यांनी व्यक्त केली.

गेले काही दिवस नेपाळमध्ये महापुरामुळे स्थिती गंभीर झाली आहे. हिमनदीचा भाग कोसळल्याने आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, काही नागरिक व पर्यटक बेपत्ता आहेत. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या नैसर्गिक आपत्तीत डोंबिवलीतील प्रकाश माने आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा माने हेही अडकले होते.

यात्रेचा अनुभव सांगताना माने म्हणाले, आम्ही तिमुरे सीमा ओलांडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली व त्यानंतर मानसरोवराचे दर्शन घेतले. कैलास पर्वताचे दर्शन सुरू असताना आम्हाला या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळाली. सुरुवातीला ही घटना एवढी गंभीर असेल, असे आम्हाला वाटले नव्हते. मात्र, समाजमाध्यम, मित्रमंडळी व विविध माध्यमांतून माहिती मिळत गेल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात आले.

दर्शन पूर्ण करून परतीच्या मार्गावर सागा शहरात आल्यानंतर स्थितीचे भीषण वास्तव भाविकांच्या लक्षात आले. ज्यांनी आम्हाला महादेवाच्या दर्शनासाठी जाताना शुभेच्छा दिल्या, ज्यांनी आमची सेवा केली, इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली, नेपाळ सीमेवरील तसेच चीन सीमेवरील अनेक व्यक्ती या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडल्याचे समजले. ही माहिती ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला, असे माने यांनी सांगितले.

या घटनेनंतर भारतीय भाविकांसह नेपाळ व अन्य देशांतील भाविकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. आमच्यासोबत अनेक तास राहिलेले, आमची सेवा करणारे लोक आता या जगात नाहीत, हे स्वीकारणे कठीण होते. आमच्यासारखेच अनेक देशांतील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. काही क्षणांत या नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, असे माने यांनी सांगितले.

केंद्र, राज्य सरकारचे आभार

आपत्तीच्या काळात भारतीय भाविकांना मायदेशी परत आणण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रकाश माने यांनी आभार मानले. चीन सरकारशी संपर्क साधण्यापासून ते आम्हाला परत आणण्यापर्यंत दोन्ही सरकारच्या माध्यमातून वेगाने हालचाली करण्यात आल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या प्रक्रियेला मोठा वेग मिळाला. एका दिवसात त्याचा परिणाम आम्हाला अनुभवायला मिळाला, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कल्याणचे आरडीसी डॉ. संदीप माने, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

‘‘आम्ही कुठे आहोत, आमची प्रकृती कशी आहे, काही अडचण आहे का, कुटुंबीयांना काही निरोप द्यायचा आहे का, याची सातत्याने विचारपूस करण्यात आली. एखादा नातेवाईक किंवा पालक ज्या पद्धतीने काळजी घेतो, त्याच पद्धतीने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने आमची काळजी घेतली,’’ असे माने म्हणाले.

मी, माझी पत्नी व आमच्या समूहातील सर्व भाविक सुखरूप डोंबिवलीत पोहोचलो आहोत. केवळ महादेवाच्या कृपेने हे शक्य झाले. संकटाच्या काळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला आणि परतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. आमच्या ग्रुपमधील इतर देशांतील भाविकही हळूहळू आपापल्या घरी पोहोचत असल्याचे संदेश मिळत आहेत, असे माने यांनी सांगितले. यात्रेत महादेवाचे दर्शन झाल्याचा आनंद असला तरी ज्यांनी भाविकांना खाण्या-पिण्याची आणि अन्य सेवा दिली, त्यांच्यापैकी अनेक जण आता हयात नसल्याचे दुःख मनात कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश माने यांच्या पत्नी प्रतीक्षा माने यांनीही यात्रेदरम्यानचे वातावरण अत्यंत भयावह आणि दुःखद असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळाल्यानंतर भाविकांमध्ये आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती. परतीचा प्रवास कसा होणार, याचीही अनेकांना काळजी होती. ज्यांनी आमची सेवा केली, त्यांच्याबाबत अशी दुःखद बातमी समजल्यानंतर तिथले संपूर्ण वातावरणच बदलून गेले. डोळ्यांसमोर घडलेल्या आणि नंतर समोर आलेल्या परिस्थितीचे वास्तव पाहणे अत्यंत वेदनादायी होते, असे प्रतीक्षा माने यांनी सांगितले.