उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेवर पुन्हा एका कलानींचे वर्चस्व प्रस्थापीत झाले आहे. यंदा शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कलानींचे शिलेदार विजयी झाले. त्यातीलच कलानी महलातील एक विश्वासार्ह आणि सुरेश उर्फ पप्पू कलानी तसेच ओमी कलानी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे कमलेश निकम यांच्या पत्नी अश्विनी निकम यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. निकम या पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून भाजपच्या उमेदवारांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. त्यांच्या जोडीला भाजपचे अमर लुंड उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत. उल्हासनगर महापालिकेत या दोन्ही पदांसाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या सत्तेला महायुतीचे नाव दिले जात असले तरी एकमेकांचे अस्तित्व संपवण्याची भाषा करणारे कलानी समर्थक आणि भाजप आता एकत्रितपणे शहराचा गाडा हाकणार आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कलानी समर्थकांनी शिवसेनेसोबत ‘दोस्ती का गठबंधन’ जाहीर करत आपली स्वतंत्र युती जाहीर केली होती. यावेळी कलानी गटाने भाजपसोबत जाणार नाही असे जाहीरच करून टाकले होते. त्यामुळे शिवसेनेने उल्हासनगरात भाजपसोबत युती टाळल्याचे बोलले जात होते. त्यातच प्रचारात भाजपचे प्रचारप्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलानींना उद्देशून अप्रत्यक्षपणे शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी भाजपला निवडून द्या, असे आवाहन उल्हासनगरवासियांना केले होते. त्याचवेळी यंदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करू असे कलानी गटाचे प्रमुख ओमी कलानी यांनी अनेकदा म्हटले होते. मात्र सत्तेच्या सारीपाटावर अखेर कलानी आणि भाजपला शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन करण्याची वेळ आली. त्यामुळे एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे कट्टर विरोधक आता पालिकेचा कारभार चालवणार आहेत.
राज्यभरात राबवलेल्या महायुतीचा प्रयोगाचा अंक उल्हासनगरातही पहायला मिळाला. एकमेकांविरूद्ध लढूनही शिवसेना आणि भाजप एकत्र आले. महापौरपद शिवसेनेच्या तिकिटावर जिंकलेल्या कलानी गटाच्या अश्विनी निकम यांना तर उपमहापौर पद भाजपच्या अमर लुंड यांना मिळाले. मंगळवारी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. या युतीमुळे उल्हासनगरात सक्षम विरोधी पक्षच उरलेला नाही. एकूण ७८ नगरसेवकांपैकी ७७ नगरसेवक हे सत्तेत सहभागी झाले आहेत.
उल्हासनगरात संख्याबळ असे
उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे ३६, भाजपचे ३७, साई पक्षाचा एक, वंचित बहुजन आघाडीचे दोन, कॉंग्रेसचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
शुभेच्छा देण्यासाठी कलानी कुटुंबीय पालिकेत
कलानी गटाच्या अश्विनी निकम महापौर झाल्यानंतर संपूर्ण कलानी कुटुंबीय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात हजर होते. यावेळी माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी, ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, नगरसेविका सीमा कलानी उपस्थित होत्या.

