ठाणेकरांच्या पाण्यासाठी काळू धरण लवकरच मार्गी

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रखडलेल्या पाणीयोजनांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.

सिंचन भवनात झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.

रखडलेल्या प्रकल्पांसाठी कृती दल स्थापन करण्याची जलसंपदामंत्र्यांची घोषणा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत पुरवले जाणारे पाणी यात तफावत असल्याने टंचाई निर्माण झाली असून येत्या काळात पाण्याची गरज भागवण्यासाठी काळू धरणाची उभारणी प्राधान्याने केली जाणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाण्यात स्पष्ट केले. सिंचन भवन येथे पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

  ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रखडलेल्या पाणीयोजनांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिंचन भवनात जिल्ह्यातील पाणीयोजनांचा आढावा घेतला. या वेळी उपस्थित पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली. जिल्ह्याची सध्याची   

लोकसंख्या आणि पाण्याचा पुरवठा यात तफावत असल्याने जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पाणीटंचाईसदृश परिस्थिती असल्याचे या वेळी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पाणीपुरवठ्यातील त्रुटींमुळे सातत्याने टंचाई निर्माण होत असून ही मानवनिर्मित टंचाई असल्याचा आरोप केला. त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना या वेळी जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी काळू आणि शाई यांसारखे प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे. यात काळू धरणाच्या उभारणीची प्रक्रिया पूर्ण होत असून ती प्राधान्यान पूर्ण केली जाईल. त्यासाठी एमएमआरडीएची मदत घेतली जात असल्याचे या वेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात अनेक पाणी योजना विविध कारणांनी रखडल्या आहेत. त्यांना मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापन करण्याचे त्यांनी या वेळी घोषित केले.

प्रक्रिया केलेल्या पाण्याला प्राधान्य

विविध शहरांत सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर कोट्यवधी रुपये खर्चून ते पाणी खाडीत सोडले जाणार असले तर हे दुर्दैवी आहे, असे सांगत पालकमंत्री एकनार्थ शिंदे यांनी उद्योगांना प्रक्रिया केलेल पाणी पुरवावे, अशी सूचना या वेळी केली. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा दर्जा वाढवून त्यात तिसऱ्या टप्प्याचे शुद्धीकरणही करावे, असेही सूचवले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही या निर्णयाला समर्थन दिले. प्रक्रिया केलेल्या पाण्याची क्षमता किती आणि त्याचा पुरवठा कधीपर्यंत केला जाईल याचा अहवाल देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्यात आले.

साठा मंजूर, पाणी नाही

बारवी धरणाच्या विस्तारीकरणानंतर ठाणे महापालिकेला १०० दशलक्ष लिटर पाणी दिले जाणार होते. मात्र वाटपाच्या सुधारित यादीत ठाणे महापालिकेचे नावच नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी या वेळी सांगितले. महापालिका बारवी धरणग्रस्तांना नोकरी देण्यासाठी तयार असून यावर तोडगा काढण्याची मागणी या वेळी शर्मा यांनी केली.

येऊर बंधाऱ्याची दुरुस्ती

ठाण्याच्या येऊरच्या डोंगरात १९९२-९३ मध्ये उभारलेल्या बंधारावजा भिंतीला सध्या गळती लागली असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पाटील यांनी लागलीच दुरुस्तीचे आदेश दिले. या भिंतीची उंची वाढवून त्यात किती पाणी साचू शकेल याचा अभ्यास करण्याचे आदेशही दिले. या पाण्याचा फायदा वर्तकनगर, शिवाईनगर, वागळे इस्टेट, शास्त्रीनगर भागाला  होऊ शकतो. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalu dam for thanekar water soon guardian minister eknath shinde akp

ताज्या बातम्या