कळवा खाडी परिसर झोपडपट्टीमुक्त?

कळवा येथील खाडीकिनारी भागातील २१ हेक्टर जागेत ५ हजार १५६ बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचा धक्कादायक बाब महसूल विभागाच्या सर्वेक्षणात समोर आली आहे.

खाडीतील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण; २१ हेक्टर अतिक्रमणापैकी ५ हेक्टर जागा कांदळवनाची

किशोर कोकणे
ठाणे : कळवा येथील खाडीकिनारी भागातील २१ हेक्टर जागेत ५ हजार १५६ बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचा धक्कादायक बाब महसूल विभागाच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. गेल्या दहा वर्षांत खाडीकिनारी भागातील गाळयुक्त जमीन आणि त्यालगत असलेल्या ५ हेक्टर जागेतील कांदळवन नष्ट करून ही बांधकामे उभे राहिल्याची माहितीही सर्वेक्षणातून पुढे आली असून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच ही बांधकामे पाडण्यासाठी महसूल विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर लवकरच झोपडपट्टीमुक्त होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणात हानी होत आहे. कळवा येथेही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा बांधकामांना अभय मिळाले आहे. येथील कळवा पूल परिसर तसेच साकेत भागात मोठय़ा प्रमाणात खाजण जमीन (गाळयुक्त) आणि कांदळवनाच्या जागेवर बेकायदा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. यामुळे खाडीचा काही भाग बुजवण्यात आला असून त्याचबरोबर खाडी प्रदूषित झाली आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रारी येऊनही जिल्हा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या तक्रारीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

या सर्वेक्षणात तब्बल २१ हेक्टर जागेमध्ये ५ हजार १५६ बेकायदा बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. या झोपडय़ांची भूमाफियांनी अवघ्या ८ ते १० लाख रुपयांमध्ये विक्री केल्याचे समोर आले आहे. तसेच कळवा खाडी किनारी भागात मोठय़ा प्रमाणात कांदळवन आहे. खाडीतील विविध जलचर आणि पक्ष्यांना या कांदळवनांचा मोठा आधार आहे. अनेक झोपडय़ा या खाडीच्या मुखाशी असलेल्या चिखलामध्ये बनविल्या आहेत. कळव्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण होत असताना प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप नागरिक आणि पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात ५ हजार १५६ बेकायदा झोपडय़ा आढळून आल्या. खाजण आणि कांदळवन क्षेत्रात ही बांधकामे झालेली आहे. बेकायदा बांधकामे करणाऱ्या सर्वावर गुन्हे दाखल केले जातील, तसेच झोपडय़ांवर कारवाईही केली जाणार आहे.

– युवराज बांगर, तहसीलदार, ठाणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalwa bay area is slum free thane ssh

ताज्या बातम्या