ठाणे : कळवा पूर्व येथील भास्कर नगर परिसरातील आदर्श चाळ येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येत असल्याने घरे वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भातील तक्रार प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत महसूल विभाग, ठाणे महापालिका आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. संबंधित यंत्रणांच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टळला असून या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार उमेश पाटील यांनी महसूल विभाग, ठाणे महापालिका आणि वन विभागाशी समन्वय साधत तात्काळ घटनास्थळी पाहणी सुरू केली.
पाहणीदरम्यान डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील नाले चोकअप झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पावसाचे पाणी अडून परिसरातील काही घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली होती. परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
ठाणे महापालिकेच्या पथकाने चोकअप झालेल्या नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई केली. नाल्यांमधील अडथळे दूर होताच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरळीत झाला आणि पाणी ड्रेनेजमार्फत योग्य पद्धतीने वाहू लागले. त्यामुळे परिसरातील घरांमध्ये साचलेले पाणीही ओसरले असून सध्या सर्व घरे सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतेही घर कोसळलेले नाही तसेच कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, ठाणे महापालिका, वन विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून वेळेत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने अशा संवेदनशील भागांवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
