ठाणे : कळवा येथील स्व. धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे दोन वाहनांची धडक होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्याने इतर वाहने घसरून अपघातांची भीती निर्माण झाली होती, तसेच या अपघातामुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले असून, हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

या अपघातात ऑटो रिक्षाचे चालक गोविंद पवार ( ४३, रा. गणपती पाडा, कळवा) यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण ( ३२, रा. घोलाईनगर, कळवा) यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी पहाटे ५.४२ वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या अपघाताची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी रविंद्र महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा पूर्वेकडून घोलाईनगरकडे जाणारी ऑटो रिक्षा आणि ठाण्याहून कळवा पूर्वेकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, रस्त्यावर ऑइल सांडल्याने इतर वाहने घसरून अपघातांची भीती निर्माण झाली होती. या अपघातात ऑटो रिक्षाचे चालक गोविंद पवार यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच खारेगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर सांडलेले ऑइल साफ करण्यासाठी माती टाकण्यात आली. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.