ठाणे : कळव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ईडी, सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा व न्यायालयीन कारवाईची धमकी देत ८ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच तिघांना मुद्देमालासह पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

संतोष मनोहर बावडेकर (४७, कळवा), सिद्धेश हरीशचंद्र बेंडकोळी (३५, कळवा) व इम्तियाज इलियास मोमीन (३१, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कळवा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सौरभ नंदकुमार साळवी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव हाईट्स या इमारतीचे मुळ मालक मृत झाल्यानंतर केलेल्या नोटरीच्या आधारे बावडेकर याने साळवी यांना ईडी, सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा तसेच न्यायालयात तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी दिली होती. संतोष बावडेकर याने या प्रकरणात ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यासाठी तसेच ईडी, सीबीआय व इतर शासकीय विभागांकडे कोणतीही तक्रार न करण्याच्या बदल्यात विविध खात्यांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये, तर संपूर्ण प्रकरण अधिकृत करून देण्याच्या नावाखाली चार कोटी रुपये, अशी एकूण आठ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीची दखल घेत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराला ध्वनिमुद्रक (व्हॉइस रेकॉर्डर) देण्यात आला होता. त्यात आरोपींकडून खंडणीची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ३० जुलै रोजी कळवा येथील केशव हाइट्समधील तक्रारदाराच्या कार्यालयात आरोपी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आले. त्यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले व १० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(६) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपींना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.