ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी ठोस कारवाईची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनापूर्वी संबंधित रुग्णाची प्रशासनाकडून भेट घेण्यात आली नव्हती किंवा या घटनेची चौकशीही करण्यात आली नव्हती, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याने या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. आंदोलनानंतर अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी संबंधित रुग्णाची भेट घेतली. तसेच, डॉ. माळगावकर यांनी रुग्णाकडून संपूर्ण घटना जाणून घेतली.
२८ ऑगस्ट रोजी रात्री वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयातील अन्नपुरवठ्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यापूर्वीही रुग्णांच्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी झाल्याचा दावा मनसेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधिष्ठाता डॉ. कदम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. संबंधित अन्नपुरवठादार ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, रुग्णाच्या ताटात झुरळ आढळल्यानंतरही प्रशासनाने त्याची साधी भेट घेतली नाही. आंदोलन केल्यानंतर अधिष्ठातांना रुग्णाची भेट घ्यावी लागली. हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा गंभीर नमुना आहे. आता केवळ रुग्णाचा जबाब नोंदवून थांबू नये, तर दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली. दरम्यान, मनसेच्या ठिय्या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आकाश शिंदे. संदीप कडू, दिनकर फुलसुंदर, गौरव केलशीकर, सिद्धेश सिंग आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
अन्न नमुने घेतले नाही
कळवा रुग्णालयातील जेवणात झुरळ आढळून चार दिवस उलटले, तरी संबंधित अन्नाचे नमुने अद्याप अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तपासणीसाठी पाठवण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाची पुढील दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
