ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाट उपलब्ध असूनही महिला रुग्णाला दाखल करून घेतले नाही. परिणामी, वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने समिती नेमली आहे.

कळवा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) शेट्टी यांच्या पत्नी संगिता शेट्टी यांना त्रास होऊ लागल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आनंद दिघे हृदयरोग केंद्रात नेण्यात आले होते. त्यांचा मृत्यु झाला असून यानंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन संताप व्यक्त केला. रुग्णालयात खाट उपलब्ध असूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आयुष्मान भारत योजनेच्या कागदोपत्री प्रक्रियेत रुग्णाला अडकवून वेळेवर उपचार दिले नसल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप राहुल पिंगळे यांनी यावेळी केला.

गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. हा केवळ निष्काळजीपणा नसून व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, अशी टिकाही त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून, कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशीही मागणीही केली आहे. दरम्यान, ६ जूनपर्यंत दोषींवर कठोर कारवाई झाली नाहीतर ठाणे महापालिका आणि रुग्णालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महिलेचा मृत्यु ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी रुग्णालय स्तरावरून करण्याचे आश्वासन संबंधितांना देण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी समिती नेमली असून त्या अहवालाच्या आधारे पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली.