ठाणे : ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी महोत्सव आयोजित करण्याचे परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली असून कळव्यातही अशा एका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कळवा परिसरातील पारसिक नगर येथे शनिवार, आज सायंकाळी ‘केकेपी पाळीव प्राणी महोत्सव – दुसरे पर्व’ आयोजित करण्यात आला असून, प्राणीप्रेमींसाठी हा एक अनोखा आणि आकर्षक सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

कळवा येथील पारसिक नगर येथील किशोर आंगण, चवंदाई देवी मंदिराजवळ सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. ‘संघर्ष आणि अभिजीत पवार मित्र मंडळा’च्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक अभिजीत पवार यांच्या कार्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘शब्दांपलीकडील नात्याचा उत्सव’ ( सेलिब्रेटिंग द बॉण्ड बियॉन्ड वर्ड्स )या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक उपक्रम, स्पर्धा तसेच प्राण्यांचे आकर्षक सादरीकरण होणार आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

या महोत्सवात जागतिक दर्जाचे विविध प्राणी आणि पक्षी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, आकर्षक पाळीव कुत्रे आणि इतर प्राणी यांचे प्रदर्शन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. यामुळे प्राणीप्रेमींना विविध प्रजातींबद्दल माहिती मिळणार असून, त्यांच्याशी जवळून परिचय होण्याची संधी मिळणार आहे.

समाजात प्राणीप्रेम आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. “अन इव्हनिंग ऑफ वॅगिंग टेल्स अँड विनिंग हार्ट्स” अशी संकल्पना असलेला हा महोत्सव कळव्यातील नागरिकांसाठी संस्मरणीय ठरणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.