ठाणे : कळवा येथील खारेगाव परिसरात कारने तिघांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. कार चालविताना चालकाचा पाय ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी कारचालक अभिषेक कदम (३१) याच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक कदम हा कुर्ला येथे कुटुंबासह राहतो. खारेगाव येथे राहणाऱ्या त्याच्या आत्येभावाला भेटण्यासाठी तो कारने आला होता. रविवारी सकाळी तो कारने कुर्ल्याच्या दिशेने घरी परतत होता. त्यावेळी कार चालविताना ब्रेक दाबण्याऐवजी त्याचा पाय एक्सिलरेटरवर पडला. त्यामुळे कारचा वेग वाढून त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील तिघांना कारची धडक बसली. या अपघातात पादचारी शुभांगी पाटील (४५) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.
आयुष पाटील (२८) हे जखमी झाले असून मालाश्री पुजारी (३२) या गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अभिषेक कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
