शहापूर: शहापूरात स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय तसेच कल्याण येथे नव्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण येथील नव्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शहापूर तालुक्याचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महसूल व वन विभागाने २३ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार कल्याण मुख्यालय असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित कार्यक्षेत्राबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित कार्यक्षेत्रात कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून शहापूर तालुका वगळण्यात आला आहे. याकडे खासदार म्हात्रे यांनी लक्ष वेधत शहापूरचाही समावेश करण्याची मागणी केली आहे.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील विस्तीर्ण, डोंगराळ आणि दुर्गम तालुका असल्याने महसुली व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना ठाणे येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट शहापूरचा दैनंदिन संपर्क, वाहतूक व्यवस्था आणि व्यवहार हे कल्याणशी अधिक सुलभ असल्याने प्रशासनाच्या दृष्टीनेही शहापूरचा समावेश कल्याण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, प्रभावी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होतील. तसेच शासनाच्या ”प्रशासन जनतेच्या दारी” या संकल्पनेलाही बळ मिळेल, असे मत व्यक्त करत लोकभावनेचा आदर करून शहापूर तालुक्याचा कल्याण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
