कल्याण – कल्याणमधील आधारवाडी कचराभूमी भागातील साठेनगर वस्तीत राहणाऱ्या कचरा वेचक घुले कुटुंबातील रवी घुले या तरूणाने कष्ट, जिद्द, अथक मेहनत आणि अवतीभवती कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना त्यावर मात करत कायद्याचा अभ्यास करत वकिलीची पदवी मिळवली आहे. अख्ख आयुष्य कचरा वेचक म्हणून घालून रवी घुले यांच्या आईने उन, पावसाची तमा न बाळगता आपल्या मुलाच्या यशस्वी जीवनासाठी कचऱ्यातून मिळणारे पैसे कासोटीला गुंडाळून ठेवले. या पै पै पुंजीमधील पैसा आणि या कुटुंबाला अनुबंध या सामाजिक संस्थेने दिलेली साथ त्यामुळे रवी घुले यांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग मोकळा झाला.
कल्याणमधील आधारवाडी कचराभूमी म्हणजे गाव वेशीवरचे कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य. या कचराभूमी जवळ वसलेल्या साठेनगर वस्तीत अनेक कुटुंबांचा चरितार्थ या कचऱ्यावरील उलाढालीतून चालतो. सकाळ उगवते ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, दिवस जातो तो कचरा वेचण्यात आणि उद्याची आशादेखील त्याच कचऱ्यात हरवून जाते. अशी परिस्थितीत असलेल्या या वस्तीतील रवी घुले या तरुणाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून स्वतःचे वेगळे भविष्य निर्माण केले. आता तो वकील बनून न्यायासना समोर उभा राहण्यास सज्ज झाला आहे. रवीच्या नावापुढे “ॲडव्होकेट” ही पदवी अभिमानाने जोडली गेली आहे. या यशोगाथेमागे अनुबंध संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांची भक्कम साथ आणि रवीची अथक जिद्द दडलेली आहे.
अनुबंधची मेहनत
वीस वर्षापूर्वी अनुबंध या सामाजिक संस्थेने कचराभूमी लगतच्या साठेनगर वस्तीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला. दारिद्र्य, उपासमार, असुरक्षितता आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पिढ्या या वस्तीत होत्या. कचरा वेचक कुटुंबातील मुलांनी शाळेचे दारही पाहिले नव्हते, अशा कठीण परिस्थितीत त्यांच्यामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम अनुबंधच्या टीमने सुरू केले. अनुबंध संस्थेच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सुरुवातीच्या मोजक्या मुलांपैकी एक विद्यार्थी रवी घुले.
हा केवळ त्या वस्तीतीलच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियातील पहिला मुलगा ठरला, त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले आणि त्याच्या माध्यमातून वस्तीतील अनेकांच्या मनामध्ये अनुबंध संस्थेने मुख्य प्रवाहातील शिक्षण विषयक स्वप्नांची पेरणी केली. परिणामी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेत रवी पाठोपाठ कचरावेचक कुटुंबातील प्रभाकर घुले, राहुल साबळे, दशरथ साबळे या मुलांसह काही मुली आता महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचल्या आहेत.
अनुबंध संस्थेने उभारलेल्या शिक्षणाच्या पायावर येथली १४ मुलं मुली आपापली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मेहनत घेत आहेत. ज्यासाठी अनुबंध संस्थेसोबतच कल्याण मधील के. एम. अग्रवाल महाविद्यालयानेही सामाजिक बांधिलकी जपत या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
पत्नीचीही वाटचाल
रवीसोबतच त्याची पत्नी सबुरी हीदेखील कायद्याचे शिक्षण घेत असून वकील बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. रवी घुलेचा हा प्रवास साठेनगरमधील असंख्य मुलांसाठी आशेचा किरण ठरला आहे. “आपलं भविष्यही बदलू शकतं” हा विश्वास त्याने आपल्या यशातून निर्माण केला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर स्वप्नांनाही पंख फुटतात हाच संदेश त्याच्या यशोगाथेतून मिळत आहे. याचे श्रेय रवी घुले आणि त्याच्या कुटुंबाइतकेच अनुबंध संस्थेच्या प्रा. मीनल सोहनी, विशाल जाधव, सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, विजया सोनावणे, ॲड. मिनाक्षी पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांना जाते.
