कल्याण – कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात न्यायिक बंदी असलेल्या एका बंद्याला भेटण्यासाठी एका अभ्यंगताकडे एक हजार रूपयांची लाच मागणाऱ्या आधारवाडी तुरूंगातील स्वागत कक्षातील दोन हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या दोन्ही हवालदारांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश तानाजी भोसले (५५), शरद नाना पानपाटील (३९) अशी लाच घेऊन पकडलेल्या हवालदारांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी, की गेल्या आठवड्यात आधारवाडी तुरुंगात न्यायिक बंदी असलेला आपला मित्र विकास नाना पगारे याला भेटण्यासाठी त्याचा दुसरा मित्र आधारवाडी तुरुंगात आला होता. त्यावेळी तुरूंगातील स्वागत कक्षातील हवालदार सतीश भोसले, शरद पानपाटील यांनी आपण न्यायिक बंदी विकास पगारे याचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे आपणास त्यांना भेटता येणार नाही, असे हवालदारांनी विकासच्या मित्राला सांगितले. भेटायचे असेल तर आपणास एक हजार रूपये द्यावे लागतील.
तुरूंगातील स्वागत कक्षातील हवालदार लाचेच्या मागणीसाठी आपणास याठिकाणी आडवत आहेत हे लक्षात आल्यावर अभ्यंगत मित्राने मी पैसे घेऊन येतो, मग भेटतो असे हवालदारांना सांगितले. दरम्यानच्या काळात अभ्यंगत मित्राने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. त्यावेळी हवालदार सतिश भोसले हे आधारवाडी तुरूंगात न्यायिक बंदीला भेटण्यासाठी त्याच्या मित्राकडे चार ते पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी करत आहेत हे स्पष्ट झाले. या दोन्ही हवालदारांनी नंतर लाचेच्या रकमेत तडजोड करून दोघांसाठी प्रत्येकी ५०० रूपये अशी एक हजार रूपये आणि एका महिला कर्मचाऱ्यासाठी पाचशे रूपये अशी एकूण पंधराशे रूपयांची मागणी केली.
अभ्यंगत मित्राने सोमवारी दुपारी आपल्या तुरुंगातील मित्राला भेटण्याचे नियोजन केले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तशी माहिती दिली. पथकाने तुरूंगाबाहेरील जागेत सापळा लावला. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार आधारवाडी तुरूंगात आपल्या न्यायिक बंदी असलेल्या मित्राला भेटण्यासाठी आला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे आधारवाडी तुरुंगाबाहेरील रस्त्यालगतच्या पदपथावर शरद पानपाटील यांना तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचवेळी हवालदार सतिश भोसले यांनाही पथकाने ताब्यात घेतले.
या दोन्ही हवालदारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे त्यांना अटक करण्याची कार्यवाही करण्यात आली. आधारवाडी तुरूंगातील न्यायिक बंदींना भेटण्यासाठी तुरूंगाच्या स्वागत कक्षातील हवालदार लाच मागत असल्याचे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही अशाप्रकारच्या लाच मागण्याच्या घटना घडल्या होत्या.
