कल्याण – कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरूंगात मंगळवारी दुपारी एका न्यायबंदीने अचानक धिंगाणा घालून कारागृहात गोंधळ घातला. बेफाम झालेल्या या न्यायबंदीने विष्ठा, मलमूत्र एका बादलीतील पाण्यात घेऊन ते कारागृहातील गस्तीवरील पोलिसांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. तुरूंगाधिकाऱ्यांच्या दालनाची काच रागाच्या भरात या न्यायबंदीने फोडली.
शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि तुरुंगातील शिस्तीचा भंग केला म्हणून पोलिसांनी न्यायबंदी रवींद्र धनाजी भोसले याच्या विरूध्द तुरूंग प्रशासनाने गुन्हा दाखल केला.
न्यायबंदी रवींद्र धनाजी भोसले आधारवाडी तुरूंगातील सर्कल क्रमांक ८ मध्ये न्यायबंदी आहे. भोसलेवर कारागृह हवालदार भगवान बागुल यांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार बागुल यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी दुपारी १२ वाजता आपण कारागृहात आपल्या कर्तव्यावर होतो. आपण न्याय बंदी सर्कल क्रमांक आठ येथे गस्तीवर होतो. यावेळी आपण न्यायबंदी आरोपी रवींद्र भोसले याला आंघोळ आणि शौचालयासाठी कोठडीतून बाहेर काढले. त्याच्या सोबत त्याला आंघोळीसाठी बादली देण्यात आली. न्यायबंदी भोसले शौचालय आणि त्यानंतर आंघोळ करील असे गस्तीवरील पोलिसांना वाटले.
पण भोसले याने त्या बादलीत मानवी विष्ठा, मलमूत्र टाकले. आणि त्यात पाणी ओतून ती बादली घेऊन तो कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धावला. म्हणून गस्तीवरील पोलिसांनी त्याला रोखले. त्यावेळी त्याने हातामधील बादलीतील घाण पाणी हवालदार बागुल आणि गस्तीवरील इतर पोलिसांच्या अंगावर फेकून देण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे कारागहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. न्यायबंदी भोसले याने बादली फेकून दिली तर तुरुंगात घाण पसरली होती. त्यामुळे पोलीस त्याला रोखण्याचा पत्यत्न करत होते.
पोलिसांनी भोसलेला पकडण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना शिवीगाळ केला. तसेच इतर पोलिसांना त्याने धक्काबुक्की केली. एका हातात घाण पाणी असलेली बादली आणि दुसऱ्या हाताने तो कारागृहाच्या भिंतीवर बुक्की मारत होता. भोसले कोणत्याही क्षणी बादली फेकून कारागृहात घाण करील या विचाराने पोलीस त्याला संयमाने हाताळत होते. त्याचवेळी न्यायबंदी भोसले वेगाने तुरूंगाधिकारी अभिजीत कोळी यांच्या दालनाच्या दिशेने पळत गेला. पोलिसांनी त्याला रोखण्याच्या आत त्याने आपल्या हाताच्या कोपराने कोळी यांच्या दालनाच्या काचा फोडल्या.
आपण मला पकडले तर मी तुमच्या अंगावर मानवी विष्ठेची बादली फेकून मारेन अशी धमकी भोसले सारखा पोलीस आणि इतर न्यायबंदीना देत होता. बराच वेळ हा गोंधळ कारागृहात सुरू होता.
अखेर मोठ्या कौशल्याने गस्तीवरील पोलिसांनी भोसले याला पकडले. त्याच्या हातामधील बादली काढून घेतली. कारागृहात धिंगाणा घालून शिस्तीचा भंग केला. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून न्यायबंदी रवींद्र भोसले याच्या विरूध्द हवालदार बागुल यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले याप्रकरणाचा तपास करत आहेत.
