बदलापूर: कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवार, ५ मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस आणि खासगी स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील एक कुटुंब स्कॉर्पिओने वाहनाने मुंबईच्या दिशेने जात होते. वैशाखरे फाट्याच्या पुढे समोरून येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसशी या वाहनाची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

तर या अपघातात मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे. बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघात वाढले आहेत.

गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.