ठाणे – कल्याण तालुक्यातील आशेळे पाडा येथे एलपीजी गॅस टंचाईमुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाड्यात असंघटित क्षेत्रात काम करणारे सुमारे ५०० कुटुंब राहतात. गॅस पुरवठा खंडित झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील एक महिन्यापासून नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक करूनही त्यांना अद्याप पुरवठा मिळालेला नाही. गॅस एजन्सीकडे वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. परिणामी, महिलांना पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वेळ खर्ची पडत आहे. तर यामुळे यातील काही महिलांचे रोजगार असलेले घरकाम ही सुटले आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत. इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कल्याण तालुक्यातील आशेळे पाड्यातील अनेक कुटुंबांना गॅस सिलेंडरसाठी तब्बल एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस वेळेवर न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, “बुकिंग करूनही महिनाभर वाट पाहावी लागते, तरीही सिलेंडर मिळेल याची खात्री नसते,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

पुरवठा अनियमित झाल्याने अनेक कुटुंबांचे नियोजन कोलमडले आहे. या टंचाईमुळे स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, नागरिक पुन्हा पारंपरिक चुलींकडे वळले आहेत. मात्र, हे केवळ असुविधेचे नव्हे तर वेळ, श्रम आणि आरोग्यावर परिणाम करणारे ठरत आहे. विशेषतः कामगार वर्गातील महिलांना याचा मोठा फटका बसत असून, रोजच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

या परिसरातील बहुतांश महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर पुरुष नाका व बांधकाम मजुरीवर अवलंबून आहेत. मात्र, चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि गॅससाठी एजन्सीच्या चकरा यामुळे महिलांना वेळेवर कामावर पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे काही महिलांची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. पल्लवी चव्हाण व देविका सकट यांची कामे सुटली असून, प्रतिभा सूर्यवंशी, प्रियांका यादव यांच्यासह शेकडो महिलांना या समस्येचा थेट फटका बसत आहे. गॅसअभावी केवळ रोजगारावरच नव्हे, तर आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या एक महिन्यापासून चुलीवर स्वयंपाक करताना निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्यांची जळजळ, खोकला व श्वसनाचे त्रास वाढू लागले आहेत.

दरम्यान, जळणासाठी परिसरातील जंगलावर काही प्रमाणात अवलंबून राहावे लागत असले तरी ते खासगी मालकीचे असल्याने त्यावरही मर्यादा आहे. “जंगलातून जळण आणण्यावर बंदी आली, तर स्वयंपाकासाठी पर्यायच उरणार नाही,” अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. गॅस टंचाई कायम राहिल्यास स्थलांतर करण्याची वेळ येईल आणि मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल, अशी गंभीर चिंता पालक पद्माकर अहिरे यांनी व्यक्त केली.

विद्युत शेगड्यांची मदत केल्यास महिलांना धुरापासून दिलासा मिळू शकतो आणि वेळेची बचत होईल. गॅस टंचाईमुळे गेल्या एक महिन्यापासून स्वयंपाक करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कामावर पोहचण्यास उशीर होत असून रोजगार जाण्याची देखील भीती आहे. – योगिता गोडसे, स्थानिक रहिवासी, आशेळे पाडा

शासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करणे किंवा पर्यायी उपाययोजना उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, या भागातील असंघटित मजूर कुटुंबांवर आणखी मोठे संकट ओढवण्याची भीती आहे. – सुनील अहिरे, असंघटित कामगार संघटना, कल्याण – उल्हासनगर