कल्याण : कल्याण महापालिकेजवळील आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी रंगणाऱ्या लोकप्रिय ”ऑल द बेस्ट” या नाटकाच्या हाऊसफुल प्रयोगाला शहरातील भीषण वाहतूक कोंडीचा फटका बसला. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा प्रयोग कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे नाट्यगृहात मोठ्या उत्साहाने दाखल झालेल्या शेकडो नाट्यरसिकांना प्रतीक्षा करावी लागली. तर यानंतर कलाकरांनीच याबाबत व्यासपीठावरून याबाबत व्यथा मांडली.
कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक कोंडीला नागरिक सामोरे जात आहे. याचा थेट फटका रविवारी कलाकारांना आणि प्रेक्षकांना बसला. रविवार असल्याने कल्याण शहरात अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्याच कोंडीत नाटकातील कलाकारांची वाहने अडकली. परिणामी नियोजित वेळेत कलाकार नाट्यगृहात पोहोचू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी नाट्यगृहात घोषणा करून प्रेक्षकांना प्रयोगाला विलंब होत असल्याची माहिती दिली. प्रेक्षकांनीही संयम राखत कलाकारांची प्रतीक्षा केली.
विशेष म्हणजे, या प्रयोगाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता आणि संपूर्ण शो हाऊसफुल झाला होता. मात्र, नाट्यगृह परिसरात किंवा जवळपास कोणत्याही प्रकारची उपहारगृहाची (कँटीन) सुविधा उपलब्ध नसल्याने प्रयोग सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय झाली.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह आलेली कुटुंबे आणि दूरवरून आलेल्या रसिकांना पाणी, चहा किंवा अल्पोपहारासाठीही पर्याय उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
यामुळे केवळ वाहतूक व्यवस्थेचाच नव्हे, तर नाट्यगृह परिसरातील मूलभूत सुविधांचाही प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असताना अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.
मी बदलापूरहून खास ”ऑल द बेस्ट” नाटक पाहण्यासाठी आले होते. शो हाऊसफुल असल्याने वातावरण उत्साहाचे होते. मात्र, भीषण वाहतूक कोंडीमुळे नाटक अर्धा तास उशिराने सुरू झाले. आम्ही प्रेक्षकांनी संयमाने प्रतीक्षा केली, पण नाट्यगृह परिसरात उपहारगृहाची सुविधा नसल्याने अनेकांची गैरसोय झाली.- शारदा नरेकर, बदलापूर
