कल्याण : शासनाने जाहीर केलेली एक रुपयाची तुटपुंजी भाडेवाढ रिक्षाचालकांना मान्य नाही. या भाडेवाढीचा फेरविचार करण्यात यावा. तसेच खासगी दुचाकी, टॅक्सीची प्रवासी वाहतूक सेवा तातडीने बंद करावी, या अशा अनेक मागण्यांसाठी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक व कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या नेतृत्वाखाली येथील उंबर्डे भागातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी संतप्त रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी केली.या आंदोलनाच्यावेळी रिक्षा चालकांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की अलीकडे करण्यात आलेली एक रूपयाची भाडेवाढ अत्यंत अपुरी आहे. ती पूर्णपणे रिक्षा चालकांना नामंजूर आहे. इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई आणि वाहन दुरुस्तीचा खर्च पाहता रिक्षाच्या भाडेवाढीचा फेरविचार करून पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये असा भाडेदर लागू करावा, अशी मागणी अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी केली.

तसेच, खासगी दुचाकी, टॅक्सी वाहतुकीला प्रवासी वाहतुकीसाठी दिलेल्या परवानगीमुळे रिक्षा प्रवासी वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी मज्जाव करण्यात यावा. शहरात बॅज, परवाना, आयुर्मान, मुदत संपलेल्या रिक्षा अधिक प्रमाणात धावतात. हे रिक्षा चालक रिक्षा संघटनांचे सदस्य नाहीत. त्यामुळे हे रिक्षा चालक मनमानी करून प्रवासी भाडे आकारणे, कुठेही रस्ता अडवून उभे राहणे असे प्रकार करतात. या रिक्षा चालकांमुळे प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणारा, रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करणारा रिक्षा चालक नाहक बदनाम होतो. अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी रिक्षा चालकांकडून करण्यात आली.

या आंदोलनात कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी अंकुश म्हात्रे, संतोष नवले, शेखर जोशी, मनोहर सासे, अविनाश खिलारे, मिलिंद पाटील, जयवंत भोईर, विनायक सुर्वे, जितेंद्र पवार यांच्यासह मोहने, कल्याण, आंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील रिक्षा चालक सहभागी झाले होते. रिक्षा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या मागण्या शासनस्तरावर मांडण्यात येतील. त्या आदेशाप्रमाणे योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

कोटशासनाने रिक्षा चालकांच्या वाढीव रिक्षा भाडेवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा. अन्यथा रिक्षा चालक राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारतील. बदल्या परिस्थितीचा विचार करून रिक्षा चालक घटकाचा आता प्रत्येक ठिकाणी विचार होणे आवश्यक आहे. तसे होत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. -प्रणव पेणकर अध्यक्ष, कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ.