कल्याण – मुंबई विद्यापीठातील ‘बॅचलर ऑफ काॅस्ट अकाऊंट’ (बी. सी. ए.) या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे विद्यापीठाचे पोर्टल बंद झाले आहे. त्यामुळे आता आपणास या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नाही. आपले वर्ष आता फुकट जाणार. यामुळे आलेल्या तणावातून कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीने उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे. या तरूणीवर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

अक्षदा भिमसिंग वळवी (१८) असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे. अक्षदा आपल्या कुटुंबीयांसमवेत कल्याण पश्चिमेतील सह्याद्रीनगर भागातील एका गृहसंकुलात राहत होती. अक्षदाचे वडील भीमसिंग नायजा वळवी (५२) हे नवी मुंबई महानगर पालिकेत नोकरीला आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल अपघाती गुन्हा नोंद प्रकरणाची माहिती अशी, की अक्षदा कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने या महाविद्यालयातून नुकतीच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

तिला मुंबई विद्यापीठातील बॅचलर ऑफ कास्ट अकाऊंटचा अभ्यासक्रम पूर्ण करून या विषयातील पदवी घ्यायची होती. तिने याबाबत आपल्या आई, वडिलांना तसे सांगितले होते. या अभ्यासक्रमाची पदवी घेण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश प्रक्रियेची (सी. ई.टी.) तयारी करून सी. ई. टी. ची परीक्षा ती चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली होती. प्रवेश प्रक्रियेला उशीर असल्याने अक्षदा आणि तिची बहिण नंदुरबार येथे आपल्या मामाच्या गावी गेल्या होत्या.

गेल्या महिन्यात १४ जूनला त्या परत कल्याण येथे आल्या. त्यानंतर पाच दिवसांनी अक्षदाने सकाळी ११ वाजता आपल्या आईला सांगितले की माझ्या पोटात मळमळ, उलटी होत असल्याचे सांगितले. अक्षदाच्या आईने मुलीला तात्काळ कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी अक्षदाला वैद्यकीय निदानासाठी तपासत असताना मळमळ का होते म्हणून विचारपूस सुरू केली. त्यावेळी अक्षदाने तपासी डाॅक्टरांना सांगितले, की मी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.

मला मुंबई विद्यापीठातून बी. सी. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करून याविषयाची पदवी घ्यायची होती. परंतु, या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे ऑनलाईन पोर्टल बंद झाले आहे. प्रवेशाचे पोर्टल बंद झाल्याने आपणास धक्का बसला. आपले आता वर्ष फुकट जाईल असे वाटू लागले. त्यामुळे मानसिक तणाव येऊन आपण उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्यायले आहे. हे द्रव्य आपण १८ जून रोजी रात्री ११ वाजता आणि १९ जून रोजी सकाळी ११ वाजता प्यायले असल्याचे अक्षदाने डाॅक्टरांना सांगितले.

डाॅक्टरांकडून ही माहिती अक्षदाच्या आई, वडिलांना समजली. हा प्रकार ऐकून आई, वडिलांना धक्का बसला. या विषारी द्रव्याने यकृत, फुप्फुसाला सूज येण्याची शक्यता असल्याने आणि दाखल केलेल्या रुग्णालयात या उपचाराच्या सुविधा पुरेशा नसल्याने डाॅक्टरांनी वळवी कुटुंबीयांना मुलीला अधिकच्या उपचारासाठी तातडीने मुंबईत जे. जे. रुग्णालय किंवा मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली.

या रुग्णालयांमध्ये उपचाराचा खर्च अधिक असल्याने आणि वळवी कुटुंबीयांची तेवढी आर्थिक ताकद नसल्याने त्यांनी मुलीला जे. जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना अक्षदाचा २८ जून रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईतील जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली होती. हा गुन्हा आता खडकपाडा पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.