Central Railway Update: मध्य रेल्वेवरील वाढती प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असून हि मार्गिका तातडीने पूर्ण करण्याबाबत खासदारांच्या विभागीय बैठकीत गुरूवारी चर्चा झाली. यामुळे कामाला गती येऊन या मार्गिकेचा काम लवकरच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास अधिक लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी चिंतन हॉल येथे पार झाली. बैठकीस खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, मंडल रेल्वे प्रबंधक हिरीष मीना, मुख्य सुरक्षा आयुक्त विवेक सागर, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार यादव, मुख्य प्रशासकीय अधिकारी अक्षय सक्सेना तसेच मध्य रेल्वेचे सचिव पी. के. चतुर्वेदी उपस्थित होते. या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरुन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच प्रवाशांना तातडीने मुलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली.
चौथी मार्गिका लवकरच
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे – पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे-पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करा, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या. तसेच मध्य रेल्वेवरील वाढती प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असून हि मार्गिका तातडीने पूर्ण करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यामुळे कल्याण- बदलापूर, कल्याण- आसनगाव चौथ्या मार्गीकेचे काम लवकर मार्गी लागण्याची चिन्हे असून ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास अधिक लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
अधिकाऱ्यांना धारेवर धरले
अमृत भारत स्टेशन अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेबाबतसुध्दा चालढकल सुरु आहे. रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठाणे रेल्वे स्थानाकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची सूचना म्हस्के यांनी केली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकांत आज सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने मुलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता यांवरुनही म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ठाणे रेल्वे स्थानकातील एफओबी आणि एक्सलेटरची कामे संथ गतीने सुरु आहेत. २ नवीन एक्सलेटर आणि १ लिफ्टचे काम प्रस्तावित आहे, या कामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली.
विविध मागण्या
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, आसनगाव, टिटवाळा मार्गावर अधिक लोकल सुरु करावी. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-पनवेल-ठाणे मार्गावर अधिकच्या लोकल सोडण्याची आणि मध्यरात्री पर्यंत सुरु ठेवावी. दुरोंतो एक्सप्रेसला पनवेल, ठाणे येथे थांबा द्यावा. सिवुड आणि उरण मार्गावर ट्रेनची संख्या वाढवी. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी. दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेस हस्तांतरीत करावे. कळवा- ऐरोली उन्नत मार्गाच्या कामाला गती द्यावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीटात असलेली सवलत पुन्हा सुरु करावी. अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. या सर्व मागण्यांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दखल घेत तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. वेलंकणी यात्रेसाठी ठाणे लोकसभा क्षेत्रातून ३० ते ३५ हजार भाविक जात असतात. भाविकांसाठी ठाणे विभागातून विशेष गाडी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले असून जुलै महिन्यात ही विशेष एक्सप्रेस सुटणार आहे, असे म्हस्के म्हणाले.
