उल्हासनगर : कल्याण-बदलापूर राज्यमार्गावर कल्याण ते बदलापूरदरम्यान १५ किलोमीटरच्या प्रवासाला उल्हासनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एक ते दीड तासाचा कालावधी लागत असल्याचे प्रवासी त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने प्रवासात अडचणी येत आहेत.

शिवाय ठिकठिकाणी वाहने भरस्त्यात उभी केली जात आहेत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सहा ते सात वाहनांना धडक दिली. त्यामुळे रस्त्यावरील गोंधळ अधिकच वाढला.

उल्हासनगर व अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरील प्रवास वाहतूक कोंडीमुळे जिकिरीचा बनला आहे. राज्यमार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम उंचसखल झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कल्याणमधील स्थानक परिसरातील कामांमुळे रस्त्यावर कोंडी असते. बदलापुरकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर दररोज वाहतूक कोंडी होत असते. वालधुनी परिसरातील पहिल्याच चौकात वाहनांच्या रांगा लागत आहेत. उल्हासनगरात प्रवेश केल्यानंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. पुढे काजल पेट्रोलपंपाकडे जाणाऱ्या चौकात रस्ते निर्मितीत उंचसखल भागामुळे काही मिनिटांच्या पावसामुळे येथे एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचत आहे. या भागात एकेरी वाहतूक सुरू आहे.

अनेकदा पावसाचे पाणी वाढल्यास वाहनांच्या वेगासरशी पाण्याचा लोट थेट दुकानात शिरत आहे. या साऱ्या प्रकारांमुळे दुकानदारांची तारांबळ उडत आहे. शिवाजी चौकातील रस्त्याच्या असमानतेमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. फॉलोअर लाइन भागात बेशिस्त वाहतूक, वाहनांची संख्या यामुळे कोंडी होत आहे.

वाहतूक पोलीस हतबल उल्हासनगरातील शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. उल्हासनगर स्थानकाकडे वळणाऱ्या वाहनांचे व्यवस्थापन होत नसल्याने कोंडी होत आहे. उल्हासनगरच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नित्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात पोलीसही हतबल झाल्याचे चित्र आहे.

अंबरनाथमध्येही संथ वाहतूक

अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विमको नाका परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावर येते. येथे पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग पाण्याखाली जातो. फॉरेस्ट नाक्याच्या पुढे जांभूळ फाटा ते बदलापूर प्रवेशद्वारापर्यंत सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने निम्मा रस्ता वापराविना आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे.